अलिबाग : रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे चार हेलिपॅड बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेली निविदा, तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नसल्याचे कारण पुढे करत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे झालेल्या कामाचे पैसे कसे आणि कुठून दिले जाणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच रायगड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या दौऱ्यासाठी सुतारवाडीजवळील जामगाव येथे चार नवीन हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

महाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुतारवाडी येथे १ कोटी ३९ लाख रुपये खर्चून चार हेलिपॅड बांधण्यासंदर्भातील निविदा काढली होती. १२ एप्रिलला गृहमंत्री नव्याने तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवरून सुतारवाडी येथे दाखल झाले होते. राजकीय वर्तुळात याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता सार्वजनिक बाधंकाम विभागाने ही निविदा रद्द केली आहे. तांत्रिक पूर्तता न झाल्याने ही निविदा रद्द करण्यात येत असल्याचे ई निविदा शुद्धीपत्रक त्यांनी एका स्थानिक मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे झालेल्या कामाचे पैसे कसे आणि कुठून दिले जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासकीय मान्यता व आर्थिक तरतूद नसल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे झालेल्या कामाचे पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांनी सांगितले.

राजकीय प्रतिक्रियांनंतर बांधकाम विभागाची माघार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही खासगी भेट होती. मग त्या दौऱ्याचा भार सरकारी तिजोरीवर कशाला, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता. एकीकडे रायगड जिल्ह्यात वाड्यावस्त्यावर रस्ते उपलब्ध नसल्याने, उपचारांअभावी लोकांचे जीव जात आहेत आणि दुसरीकडे देशाच्या गृहमंत्र्यांच्या एका वेळच्या जेवणासाठी, यजमानांच्या घरी जाता यावे यासाठी १ कोटी ३९ लाख रुपये खर्च केला जात असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या प्रदेश सचिव नंदा म्हात्रे यांनी घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या खर्चावर नाराजी व्यक्त केली होती. राजकीय वर्तुळात उमटलेल्या या प्रतिक्रियांनंतर बांधकाम विभागाने ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tender for four helipads in sutarwadi worth rs 1 5 crore cancelled amy