हिंगोली जिल्ह्यात गुरुत्त्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी आखलेल्या प्रकल्पाचे काम करण्यासाठी १६०० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. चार किलोमीटरच्या इंग्रजी ‘एल’ आकाराची पोकळी असणारे दोन हात आणि जोडभागात प्रयोगशाळेसाठी साहित्य यासाठी १७० एकरावर हे काम पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष वैज्ञानिक चाचण्यांना २०३० पासून सुरुवात होईल, अशी माहिती ‘लिगो ’ इंडियाचे प्रवक्ते व आयुकामधील प्रा. संजित मित्रा यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात गुरुत्त्वीय लहरी खगोलशास्त्रातील बहु-संस्थात्मक वेधशाळेच्या प्रकल्पासाठी प्रगत प्रायोगिक सुविधा उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पासाठी २०१६ मध्ये तत्वत: मान्यता दिली होती. निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली होती.
आता या प्रकल्पाच्या बांधकामविषयक कामाची निविदा काढण्यात आली आहे. गुरुत्त्वीय लहरीसाठी अशा दोन निरीक्षणात्मक प्रयोगशाळा अमेरिकेमध्ये हॅनफोर्ड, वॉशिंग्टन येथे आहेत. भारतातील या गुरुत्त्वीय लहरीच्या अभ्यासासाठीच्या ‘लिगो प्रकल्पा’साठी वैज्ञानिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या प्रकल्पाचे काम सुरू करण्याची पहिली निविदा आता प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण १७४ एकराचा हा भाग असून, त्यातील १७० एकरावर पोकळ नलिकांचे काम होणार आहे.
४८ महिन्यात काम पूर्ण करण्याची अट
गुरुत्वीय लहरीच्या अभ्यासासाठी अणुऊर्जा विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान, राष्ट्रीय विज्ञान फाऊंडेशन आणि गुरुत्वीय लहरी निरीक्षण या विभागाच्या समन्वासह विदेशातील या क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या दोन्ही प्रयोगशाळांसह अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासासाठी तयार करण्याच्या चार किलोमीटरच्या पोकळ नलिकेसह अन्य सर्व पायाभूत सुविधा ४८ महिन्यांत पूर्ण करण्याची अट निविदेत टाकण्यात आली आहे.