राजापूर : राजापूर शहरात जवाहर चौकामध्ये होळी उत्सवात दोन गटात झालेल्या वादावादी नंतर राजापुर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आता पर्यंत दोन्ही बाजूकडील २१ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर शहरात पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यामधील धूतपापेश्वर शिमगोत्सवामध्ये दोन गटात झालेल्या वादावादीच्या प्रकरणानंतर येथे तणावपूर्ण शांतता आहे. मात्र या वादावादीला राजकीय स्वरूप देण्याचे काम काही राजकीय नेत्यांकडून केले जात असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. हा वाद आता मिटला असला तरी यातील दोषींवर कडक करावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा एका गटाने दिला आहे.
राजापुर तालुक्यातील प्रसिद्ध धूतपापेश्वर मंदिराचा शिमगोत्सव दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या धूतपापेश्वर देवाची होळी वाजत गाजत राजापुर शहरातून फिरवली जाते. त्यानंतर ही होळी शहरातील जवाहर चौकात आणून नाचवली जाते. त्यानंतर ही होळी तेथेच असलेल्या जामा मशीदीच्या पायरीला टेकवली जाते. ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू असताना येथील एका गटाचे लोक होळीला नारळ देखील अर्पण करतात. मात्र या प्रथेला गालबोट लावण्याचे काम काहींच्या हातून झाल्याने येथील वातावरण तणावाचे निर्माण झाले होते.
धूतपापेश्वरची होळी जवाहर चौकातील जामा मशिदीचा दरवाजाशी आली असता येथील गेट बंद केला. तर आलेल्या होळीला बाहेर ढकळण्याचा प्रयत्न केला गेला. या वादात होळीचा माड जास्त वेगाने पुढे जावून मशीदीचा गेट तोडून आत शिरली. यामध्ये काही लोक जखमी झाले. यावेळी दोन गटात बाचाबाची झाल्याने येथील वातावरणात तणावाचे निर्माण झालं होते. मात्र पोलिसांनी वेळीच लक्ष घालून येथील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी येथील वातावरण शांत केले असले तरी, या वादाला राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणाची एमआयएमच्या नेत्यांनी देखील दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी एका गटाने केली आहे. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा ही दिला आहे.
कोकणात होणारा शिमगोत्सव शांततेत आणि मोठ्या उत्साहात केला जातो. मात्र असे वादावादीचे प्रकार या वर्षीच घडत असल्याने जिल्हा वासियांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्या पाठोपाठ राजापुर तालुक्यात देखील दोन गटात झालेली हाणामारी आणि बाचाबाची कोकणातील शांतता भंग करणारी ठरली असल्याचे बोलले जात आहे.
राजापुर तालुक्यातील दोन गटातील झालेल्या या प्रकरणा नंतर राजापुर शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील लोकांना शिमगोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे. राजापुर प्रकरणावर जिल्हा पोलिसांनी मशिदीत होळी घुसवण्याचा प्रकार घडलेला नसल्याचे सांगितले आहे. मात्र मशिदीचा गेट तोडून धुतपापेश्वराची होळी घुसविण्याचा प्रकार घडला असल्याचे काही स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
राजापूर शहरात घडलेल्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत असून परस्पर तक्रारी नंतर याप्रकरणी आतापर्यंत २१ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजापूरमध्ये शांतता असून आता पर्यत २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणा नंतर जनतेला शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. – राजापुर आमदार कीरण सामंत