साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या खासदार उदयनराजेंच्या मालकीच्या इमारतीवर उदयनराजेंचे भित्तीचित्र (वॉलपेंटिंग) रेखाटण्यावरून साताऱ्यात पोवई नाक्यावर तणावाचे वातावरण झाले. उदयनराजेंचे चित्र काढणाऱ्या चित्रकाराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तणाव वाढला होता. या प्रकरणी पोवई नाक्याबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानालगत असलेल्या खासदार उदयनराजेंच्या मालकीच्या इमारतीवर उदयनराजेंचे भित्तीचित्र रेखाटण्याचे (वॉल पेंटिंग) काम त्यांचे कार्यकर्ते मागील दोन दिवसांपासून करत आहेत. यावरून दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. यासाठी क्रेनच्या मदतीने भिंतीवर चित्र रेखाटण्यात येत होते. आज सकाळी हे चित्र रेखाटत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने साताऱ्यातील पोवई नाका परिसरात तणावाचे वातावरण झाले. चित्रकाराला (पेंटरला) पोलिसांनी मज्जाव केल्याने व चित्र रेखाटताना खाली उतरण्यास सांगितल्याने त्याने भिंतीवरून खाली उडी मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांला खाली उतरण्यास सांगितले व ताब्यात घेतले. यानंतर त्याला समज देऊन सोडण्यात आले. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पेंटिंग काढण्यात येणारी इमारत उदयनराजेंच्या मालकीची आहे.
विनापरवाना कृत्य साताऱ्यात सहन केले जाणार नाही – शंभूराजे देसाई
काय चालले आहे, हे मला माहीत नाही आणि मी मंत्री असल्यामुळे माझ्या घराच्या बाहेर बंदोबस्त आहे. त्याचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. मात्र कोणतेही विनापरवाना कृत्य साताऱ्यात सहन केले जाणार नाही. वेळप्रसंगी कायद्याचा अंमल केला जाईल, असा इशारा शंभूराज देसाई यांनी उदयनराजेंच्या पेंटिंगवरून दिला.
हेही वाचा – “संजय राऊतांना विनंती करतो की…”, चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आवाहन
शंभर टक्के तेथेच भित्तीचित्र रेखाटण्यावर आम्ही ठाम – प्रीतम पळसकर
उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे दैवत आहेत. मग त्यांचे भित्तीचित्र रेखाटण्याला विरोध का? असा सवाल उदयनराजेंचे कार्यकर्ते प्रीतम कळसकर यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री देसाई यांनी सांगितले आहे की, उदयनराजेंचे भित्तीचित्र रेखाटले तर मला आनंदच आहे. मग ते विरोध का करत आहेत? याबाबत भित्तीचित्र रेखाटणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला समज देऊन सोडण्यात आले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर चर्चा करून मार्ग काढू, असे सांगितले आहे. उदयनराजेंचे चित्र या ठिकाणीच रेखाटले जाणार असून, शंभर टक्के येथेच भित्तीचित्र रेखाटण्यावर आम्ही ठाम असल्याचे प्रीतम पळसकर यांनी सांगितले