अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचा हनुमान चालिसा पठणाशी संबंधित फलक रविवारी फाडला. त्याला प्रत्युत्तर म्हणून राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकातील ठाकरे गटाच्या फलकाची मोडतोड केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
ठाकरे यांची आज, सोमवारी अमरावतीत संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आमदार राणा यांनी, ‘‘ठाकरे पावसाळय़ातील बेडकाप्रमाणे आता बाहेर पडले आहेत,’’ अशी टीका केली. तसेच ठाकरे यांच्या सभेच्या वेळीच येथील गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ठाकरे सरकारने हनुमान चालिसा पठणाला विरोध करून खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना १४ दिवस तुरुंगात टाकले, असा उल्लेख असलेले फलकही शहरात लावण्यात आले आहेत. हे फलक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडले आणि राणांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाही दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून राणा यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या फलकांची मोडतोड केली. या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
ठाकरेंची आज सभा
उद्धव ठाकरे यांची आज, सोमवारी येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी ते अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.