राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल आज लागला. ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेला निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांंना तारेवरची कसरत करावी लागली. निकालाचे टेन्शन असतानाच ऐनवेळी बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेने दगा दिल्याने मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
   गुरुवारी सकाळी ११ वाजता इंटरनेटवर निकाल जाहीर होणार होते. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील सायबर कॅफेवर तरुणांनी गर्दी केली होती. मात्र आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास अशी गत या तरुणांची झाली. निकालाच्या टेन्शनमध्ये असणाऱ्या मुलांना बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेने ऐन वेळी दगा दिला. सकाळी १०.३०च्या सुमारास बंद पडलेली इंटरनेट सेवा संध्याकाळपर्यंत सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे मुंबई-पुण्यातील आपल्या नातेवाईकांना फोन करून निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न सुरू होता.
काही खाजगी मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सुरू असल्याने विद्यार्थ्यांंनी त्यावर निकाल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. काहींना त्यात यश आले. निकालासाठी राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेले  http://www.maharesult.nic.in  हे संकेतस्थळ सुरू होत नव्हते. त्यामुळे  निकालाचे टेन्शन असतानाच इंटरनेट सेवेचा गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.