मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज ठाकरे असा वाद निर्माण झाला आहे. पण या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील उडी मारली आहे. शुक्रवारी मुंबईत दाखल होऊन आम्ही मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी गुरुवारी जाहीर केलं होतं.

त्यानुसार राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. ते मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याने मातोश्रीबाहेर शेकडो शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. संबंधित प्रकार लक्षात घेता परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली आहे. राणा दाम्पत्य हे सध्या मुंबईतील खार येथील आपल्या घरी आहेत.

शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर देखील गर्दी केली आहे. अशीच गर्दी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. अशा स्थितीत राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेले, तर मोठा अनर्थ घडू शकतो. ही बाब लक्षात घेऊन खेरवाडी पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली आहे.

मातोश्री बंगला हा मुख्यमंत्र्यांचं खाजगी निवासस्थान आहे. परिसरात अनेक शासकीय कार्यलये आणि इतर अतिमहत्त्वाची आस्थापने आहेत. तसेच याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. तसेच धरणे, आंदोलने, रॅली, संप, निदर्शने असे कार्यक्रम फक्त आझाद मैदानात करण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात अंदोलन अथवा निषेध करू नये. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस खेरवाडी पोलिसांकडून राणा दाम्पत्याला बजावण्यात आली आहे.