लांबलेल्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम; कामगार अडचणीत
मराठवाडय़ाची ‘शिवकाशी’ अशी ख्याती असलेल्या तेरखेडा येथील फटाका उद्योगाला यंदा समस्यांचे ग्रहण लागले आहे. सततचा पाऊस, त्यामुळे उत्पादनावर झालेला परिणाम, त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे झालेली कोंडी २० कोटी रुपयांच्या उलाढालीला प्रभावित करून गेली आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास पाचशेहून अधिक कुशल कामगारांच्या रोजगारावर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती उद्योजक व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा फटाका उद्योग तेरखेडा परिसरात विस्तारलेला आहे. मागील साडेतीन दशकापासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण उद्योगामुळे ‘छोटी शिवकाशी’ असे बिरुद तेरखेडय़ाला लागले आहे. शासन निकषाच्या अधीन राहून कमी आवाज आणि कमी प्रदूषण होणाऱ्या फटाक्यांचीच येथे निर्मिती केली जात असल्याचा दावा येथील उद्योजक करतात. साधारणत: येथेच विकसित झालेले ‘तेरखेडी तोटे’ हे वाण सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्याबरोबरच सुतळी बॉम्ब, फुलबाजे, मातीचे भुईनळे, रंगीत आकर्षक फटाके सण, उत्सव याबरोबर राजकीय कार्यक्रमांना लागणाऱ्या आदल्यांचे उत्पादन येथे मोठय़ा प्रमाणात केले जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तेरखेडा येथील फटाक्यांना लक्षणीय मागणी असते. तेरखेडय़ात सध्या फटाका निर्मितीचे एकूण १८ कारखाने आहेत. त्यात सुमारे पाचशेहून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झालाय. या उद्योगातून दरवर्षी सुमारे दहा कोटीच्या घरात उलाढाल होते.
यंदा पावसाने मुक्काम वाढविला. त्याचा फटाक्यांच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला. सतत पाऊस लागून राहिल्यामुळे फटाक्याच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा आíथक हानी सहन करावी लागणार, असे चित्र आहे.
तेरखेडा येथील फटाका उद्योगाचा इतिहास मोठा रंजक आहे. निजामाची राजवट संपल्यानंतर निजामाच्या दरबारी दारूकाम करणाऱ्या कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यातूनच हुसेन नवाज सय्यद दारुवाले, अब्बास नवाज सय्यद दारुवाले आणि इब्राहिम मुल्ला आदीनी तेरखेडय़ात फटाका उद्योगाची सुरुवात केली. आता त्यांची दुसरी पिढी या व्यवसायाला मोठय़ा प्रमाणात पुढे घेऊन जात आहे. खऱ्या अर्थाने तेरखेडा येथे १९८२ साली फटाके निर्मितीस प्रारंभ झाला. जेके फायर वर्क्स, अब्बास फायर वर्क्स आणि चातक फायर वर्क्स या तीन कारखान्यांनी उत्पादन सुरू केले. त्यानंतर क्रांती फायर वर्क्स, मयूर फायर वर्क्सही फटाका उद्योगात उतरले. आजमितीला या परिसरात २२ वेगवेगळे फटाका कारखाने सुरू आहेत. त्याचबरोबर नव्याने प्रस्तावित चार कारखान्यांचे अर्ज परवानगीसाठी लटकले आहेत.
वाढत असलेली कारखान्यांची संख्या आणि उपलब्ध जागा पाहता या परिसरात फटाका कारखान्यांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी, अशी जुनीच मागणी पुन्हा नव्याने समोर येऊ लागली आहे.
औद्योगिक वसाहतीचे भिजत घोंगडे
- तेरखेडा येथील फटाका उद्योगाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य सरकारने २००५ साली फटाका उद्योगासाठी स्वतंत्र एमआयडीसी निर्मितीची घोषणा केली.
- तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून १३५ एकर जागा संपादित करण्यात आली.
- वाशी तालुक्यातील गोजवाडा येथे असलेल्या या जमिनीला खादी ग्रामोद्योग विभागानेही अनुमती दिली. मात्र, गावकऱ्यांनी विरोध केला. आणि फटाक्यांच्या स्वतंत्र औद्योगिक वसाहतीचे घोंगडे तेव्हापासून भिजत पडले आहे.
धोकादायक, मात्र चरितार्थाचे साधन
मागील सहा वर्षांत तीन वेळा स्फोट होऊन पंधरा जणांचा बळी गेला. अनेकजण कायमचे जायबंदी झाले. कारखानदारांकडून तात्पुरती मदत वगळता ठोस मोबदला कामगारांना मिळाला नाही. मृत कामगारांचे कुटुंबीय उघडय़ावर पडले. पतीच्या निधनानंतर अनेक विधवा पुन्हा फटाका कारखान्यातच चरितार्थासाठी मोलमजुरी करू लागल्या आहेत. धोकादायक असला तरी चरितार्थासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे याच कामाला प्राधान्य दिले जाते. निसर्गाचा लहरीपणा, आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे या रोजगारालाच फटका बसण्याची भीती येथील कारखानदार तय्यब दारूवाले यांनी व्यक्त केली.