पुणे-बंगळूर महामार्गावर आज (शनिवार) झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. कासेगाव नजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर कार आदळून ही दुर्घटना घडली. कासेगाव (ता. वाळवा) येथे महामार्गावर येवलेवाडी फाट्यावर शर्यत हॉटेल जवळ कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कार मधील ५ जण ठार झाल्याची घटना दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येवलेवाडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल शर्यत जवळ आशियाई महामार्गाच्या कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच ०५ ए एम ३६४४) थांबलेला होता, मात्र कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच १४ डी एन ६३३९) उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली. यामध्ये कारमधील चालक अरिंजय आण्णासो शिरोटे रा. जयसिंगपूर, यांच्यासह एक महिला स्मिता अभिनंदन शिरोटे (वय ३८) व तीन मुले पूर्वा अभिनंदन शिरोटे (वय १४), सुनिशा अभिनंदन शिरोटे (वय ०९), वीरेन अभिनंदन शिरोटे (वय ०४) हे गंभीर जखमी झाले होते. यामधील तिघांना उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे तर दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव येथे हलवण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

यावेळी काहीकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कासेगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.