कोकणातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प आता बारसू येथे होणार आहे. यासाठी येथे सर्वेक्षणही सुरू करण्यात आले. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. अधिकारी सर्वेक्षणाला येणार असल्याचे समजताच स्थानिकांनी तेथे आंदोलन पुकारले. स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने सरकारने येथे प्रकल्प राबवू नये अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. ठाकरे गटानेही या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते आणि राजापुरातील स्थानिक आमदार राजन साळवी यांनी ट्वीट करत प्रशासनाकडेच साकडे घालून प्रकल्पाला समर्थन दर्शवलं आहे.
कोकणात रिफायनरी प्रकल्प आल्यास येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोकणातील बहुंताश तरुण वर्ग नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाला आहे, परंतु हा प्रकल्प कोकणात आल्यास नोकरीच्या शोधात तरुणांना शहराकडे येण्याची गरज नसल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कोकणातील प्रकल्पाला समर्थन आहे, असं राजन साळवी म्हणाले. त्यांनी आज ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
राजन साळवी ट्वीटमध्ये म्हणतात की, “कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच. माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये.”
“रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथील जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवील होती”, असा मोठा दावा काल (२५ एप्रिल) शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी तो पर्याय सुचवला असेल. परंतु, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने आम्हीही लोकभावनेच्या बाजूने असू. प्रकल्पाविरोधात येथील लोक गोळ्या झेलायला तयार असतील तर पहिली गोळी शिवेसनेच्या छातीवर जाईल. “
हेही वाचा >> “बारसूतील रिफायनरीविरोधात स्थानिक मरायला तयार असतील तर…”, संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हवा तेज में चल…”
बारसू येथील प्रकल्पाला ठाकरे गटाच्या शिवसेनेने लोकभावनेच्या बाजूने जात विरोध दर्शवलेला असतानाच राजन साळवी यांनी लोकांना प्रकल्पाची बाजू पटवून देण्याचे आवाहनच प्रशासनाला केले आहे. त्यामुळे एका प्रकल्पावरून पक्षात विसंवाद असल्याचं स्पष्ट झाले असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.
दरम्यान, आंदोलन करणाऱ्या ११० जणांना काल पोलिसांनी अटक केली होती. या ११० जणांना आज राजापूर न्यायालायने जामीन मंजूर केला आहे.