जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांसह काही महिलांनाही मारहाण केली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी एकेरी उल्लेख करत भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं. पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारनंतर नितेश राणे तोंडात बोळा घालून बसले आहेत का? असा सवाल शरद कोळी यांनी विचारला.
“जालन्यात काल मराठा समाज बांधवांवर गृहमंत्र्यांच्या (देवेंद्र फडणवीस) आदेशाने लाठीमार करण्यात आला. तिथल्या आंदोलकांवर आणि महिला भगिनींवर बेछूट लाठीमार केला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. गोळीबार केला. परंतु लव्ह जिहाद केलेला भाजपाचा नितेश राणे आता कोणत्या बिळात जाऊन बसला आहे? त्याचं तोंड आता शिवलं आहे का? तोंडात बोळा घालून बसला का?” अशा शब्दांत शरद कोळी यांनी टीकास्र सोडलं.
हेही वाचा- “…तर महाराष्ट्रातला मनसेचा पहिला खासदार १०० टक्के मीच असेल”, वसंत मोरेंचं मोठं विधान
शरद कोळी पुढे म्हणाले, “गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे की, मराठा समाज बांधवांनी पोलिसांवर दगडफेक केली. पण हे पूर्णपणे खोटं आहे. कारण आजपर्यंत मराठा समाजाने लाखोंच्या संख्येनं आंदोलन केलं. पण एक घोषणाही चुकीच्या पद्धतीने दिली नाही. मग ही दगडफेक तर खूप लांबची गोष्ट आहे.”
हेही वाचा- “अजित पवारांचे सर्व अधिकार काढून…”, फडणवीसांच्या नियंत्रणाबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान
पण भाजपाच्या काही नेत्यांनी मराठा समाजावर हल्ला करून यापुढे आरक्षण मागायचं नाही, आंदोलन करायचं नाही, असा एकप्रकारे इशारा दिला आहे की काय? असा प्रश्न पडतो. तुम्ही आंदोलन केलं तर तुम्हाला पोलीस यंत्रणेद्वारे असंच बेदम मारलं जाईल, असा इशाराच सरकारने दिला आहे. पण मी सांगू इच्छितो मराठा बांधवांसह राज्यातील इतर आठरा पगड जातीचे लोक २०२४ ला भाजपाला त्यांची औकात आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही ठाकरे गटाचे नेते शरद कोळी म्हणाले. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली.