शिवसेनेत फूट पडून जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. पण अद्याप सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल लागला नाही. शिवसेनेतील सत्तासंघर्ष आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर, न्यायालयाने संबंधित निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घ्यावा, असा निकाल दिला होता. न्यायालयाच्या या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांनी अद्याप १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यास विलंब करत असल्याने आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीकास्र सोडलं आहे. विधानसभा अध्यक्ष कुठलाच निर्णय देत नाहीत, त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. यामुळे विधानसभा अध्यक्ष केवळ वेळकाढूपणा करत आहे, हे आता स्पष्ट झालं आहे, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
१६ आमदारांच्या अपात्रतेवर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले, “आमचे वकील देवदत्त कामत होते. त्यांनी बाऊन्सर टाकला आणि विधानसभा अध्यक्षांना सांगितलं की, तुम्ही जो निर्णय द्याल, तो निर्णय आमच्यावर न्याय करणारा असेल किंवा अन्याय करणारा असेल. तो निर्णय खरा असेल किंवा खोटा असेल. निर्णय काहीही असला तरी आम्ही पुन्हा तुमच्याकडे पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही. पण तुम्ही काहीतरी निर्णय द्या. तुम्ही कुठलाच निर्णय देत नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. यामुळे विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत, हे स्पष्ट झालं.”