कोकणातील बेकारांना काम मिळेल, असे कारण देत राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केलेले उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी माघार घेतली आहे. बारसूच्या विरोधात आंदोलन केलेल्या आंदोलकांना पोलिसांनी दिलेली वागणूक जिव्हारी लागल्यामुळे आपण हा निर्णय घेत आहोत, असे साळवी यांनी मंगळवारी (२ मे) रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री ठाकरे येत्या शनिवारी (६ मे) बारसू येथे आंदोलकांची भेट घेणार आहेत. त्या वेळी त्यांना राजकीय दृष्ट्या अडचणीचे होऊ नये म्हणून साळवी यांनी हे घूमजाव केले असावे, असे मानले जाते.
राजन साळवी म्हणाले, “उद्धव ठाकरे माझे दैवत आहेत. त्यामुळे ते देतील तो आदेश आपल्याला मान्य राहील. मी रिफायनरीला समर्थन दिले होते तेव्हा खासदार विनायक राऊत यांनी बारसूचा दौरा केला. मीदेखील तेथे होतो. परंतु माझ्याबाबत स्थानिकांमध्ये रोष होता. म्हणून मी पुढे गेलो नाही. त्यानंतर उशीरा राजापूर पोलीस ठाण्यात जाऊन खासदार राऊत व अन्य सहकाऱ्यांची भेट घेतली. झालेला सर्व प्रकार मनाला वेदना देणारा आहे.”
“पोलिसांनी आंदोलकांवर केलेला लाठीमार मनाला वेदना देणारा”
“राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी माझी भूमिका जाहीर केली. त्यानंतर माझ्याविरोधात चार गावांमध्ये रोष निर्माण झाला होता. माझी भूमिका ही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याची होती. मात्र पोलिसांनी आंदोलकांवर केलेला लाठीमार मनाला वेदना देणारा होता. मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो,” असं राजन साळवी यांनी सांगितलं.
“…म्हणून मी या भूमिकेवरून माघार घेतली”
“जनतेशी संवाद साधून प्रशासन यातून मार्ग काढेल, असे मला वाटले होते. मात्र तसे न होता आंदोलकांना ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचे समर्थन मी करू शकत नाही. म्हणून मी या भूमिकेवरून माघार घेतली आहे. येत्या शनिवारी ठाकरे बारसूमध्ये येणार आहेत. त्या वेळी ते देतील तो आदेश मला मान्य राहील,” असंही साळवींनी नमूद केलं.