राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये मराठी पाट्या लावण्यात याव्यात, असे आदेश देताना न्यायालयाने याचिकाकर्त्यांना २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक आंदोलनं केली आहेत. तसेच शिवसेनेनेही हा विषय मांडला होता. आता या लढाईला यश आल्यानंतर मनसे आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठी पाट्यांचा विषय मनसेने लावून धरला, तसेच यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलनं केली असून शिवसेनेचा उबाठा गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंबंधी एक ट्वीट करून ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
अमेय खोपकर यांनी एक टवीट केलं आहे. या ट्वीटमध्ये खोपकर यांनी म्हटलं आहे की, राज्यभरात दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने ‘मी पुढे, मी पुढे’ असं करत श्रेय लाटण्याचा किळसवाणा प्रकार सुरु केला आहे. मराठी पाट्यांचं आंदोलन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आम्ही मनसैनिकांनी पुकारलं होतं आणि गाजवलं होतं. माजिद मेमनसारखे बडे वकील आणि स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे महेश भट्ट अशा लोकांना आम्ही भिडलो होतो. उबाठा गटाचे सैनिक बच्चे होते तेव्हा आम्ही मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन मराठीचा आवाज बुलंद केला होता.
अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे की तेलही गेलं, तूपही गेलं हाती धुपाटणं आलं अशी अवस्था असलेल्या उबाठा गटाने श्रेय मिळवण्याचा आटापिटा करणं हे खूपच हास्यास्पद आहे. मनसे आंदोलनाचा हा बघा (खोपकर यांनी काही फोटो शेअर केले आहेत) एक पुरावा. छायाचित्रात मराठी पाट्यांसाठी लढणारे मनसे कार्यकर्ते दिसतायत. अमेय खोपकर, संदीप देशपांडे, शशांक नागवेकर, गिरीश धानोरकर, सचिन चव्हाण आणि इतर मनसैनिकांनी मराठी पाट्यांसाठी आंदोलनं केली आहेत.
यासह अमेय खोपकर यांनी वर्तमान पत्रांचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेने केलेल्या आंदोलनाच्या बातम्या आणि फोटो छापून आले आहेत.