ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाबाबत गौप्यस्फोट केला आहे. “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत. त्यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का?” असा प्रश्न शरद पवारांनी विचारल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातल्याचं नमूद केलं.
अरविंद सावंत म्हणाले, “शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”
“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली”
“असं असूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं. यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली. हे शिवधनुष्य उद्धव ठाकरेंनाच घ्यावं लागेल असं शरद पवार म्हणाले,” अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
“देश अध्यक्षीय हुकूमशाहीकडे”
दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२ एप्रिल) भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “देशाची वाटचाल अध्यक्षीय हुकूमशाहीकडे होत आहे. सत्ताधारी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत आहेत, मात्र सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आता या पक्षाचे नामांतर ‘भ्रष्ट जनता पार्टी’ असे करण्याची वेळ आली आहे.”
लोकशाहीवर घाला घालताना न्यायालयांवरही नियंत्रण ठेवण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. मात्र असे होऊ नये म्हणूनच घटना रक्षणासाठी महाविकास आघाडी ‘वज्रमूठ’ बांधत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा : संभाजीनगर आणि मालवणी येथील घटनांवर शरद पवारांनी पहिल्यांदाच केल भाष्य; म्हणाले…
हिंदूत्व सोडल्याची टीका करतात, परंतु हिंदूत्वाचे मोजमाप करण्याची तुमची पात्रता नाही. काश्मीरमध्ये भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर युती केली होती, तेव्हा ते कोणते हिंदूत्व होते? मेघालयात संगमा काही दिवसांपूर्वी भ्रष्ट होते. नितीशकुमार यांचे सरकार पाडले तेव्हा तुम्ही काय करत होतात, असे प्रश्न करत ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.निवडणुका जवळ आल्या, की जातीय तेढ निर्माण करायची. जेथे हिंदूना आक्रोश करावा लागतो तो नेता काय कामाचा? मी हिंदूत्त्व सोडले त्याचे एक उदाहरण दाखवा, मी घरी बसेन. आम्ही घटनेची पूजा करत आहोत आणि तिचे रक्षण करणार आहोत, असेही ठाकरे म्हणाले.