ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे. २०२४ मध्ये सोलापूरचं राजकारण पूर्णपणे बदललेलं दिसेल आणि भाजपाची पाटी कोरी झालेली दिसेल. घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती आता झाली आहे. रावणाची जशी दहा तोंडं उडवली होती. तशी यांचीही तोंडं उडवली जातील, अशी टीका संजय राऊतांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
प्रकाश आंबेडकरांबरोबरच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “देशाची राज्यघटना वाचवण्याच्या लढाईत प्रकाश आंबेडकर नक्कीच आघाडीवर असतील. प्रकाश आंबेडकरांची ताकद जेव्हा आम्हाला मिळते, तेव्हा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात विजयाचा मार्ग मोकळा होतो. एक फार मोठा समाज आणि वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. आम्ही सगळे एकत्र राहू. त्यामुळे २०२४ साली सोलापूरचं राजकरणही पूर्णपणे बदललेलं दिसेल आणि भारतीय जनता पार्टीची पाटी कोरी झालेली दिसेल.”
हेही वाचा- “…तर मोदींनी पाकिस्तानशी संगनमत करून बॉम्ब टाकला असता”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
“सध्यात राज्यातील राजकारण राजकारण राहिलं नाही. या राज्याने अनेक प्रमुख नेते पाहिले. त्यांचं राजकारण पाहिलं. पण इतकं सूडाचं, बदल्याचं आणि बदनामीचं राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधी पाहिलं नाही. हे सर्व मागील दहा वर्षांत सुरू झालं आहे. अशा घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती आता झाली आहे. रावणाची जशी दहा तोंडं उडवली गेली, तशीच यांचीही तोंडं उडवली जातील,” अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला.