विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला या ठरावाबद्दल काही माहिती नसल्याचं सांगितलं असल्याने चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांनी सही केली नसल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी हा तांत्रिक मुद्दा असल्याचं सांगितलं. “राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असून घटनात्मक पदावर असताना ते एकपक्षीय काम करतात हा आरोप आहे. ते विरोधी पक्षांना बोलू देत नाहीत. ते लोकशाहीचा गळा घोटतात. पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतात, बोलतात आणि काम करतात. नियम पाळले जात नाहीत,” असं संजय राऊत म्हणाले.
“घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती राज्यपाल असो किंवा विधानसभा अध्यक्ष असो, त्यांनी पक्षपाती वागू नये. त्यांनी नियम, कायदे आणि घटनेचं पालन करावं. त्या खुर्चीववर बसलेले असताना तुम्ही पक्षाची वस्त्रं आणि चपला काढून ठेवल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नाही,” असा आरोप संजय राऊतांनी केला.
“विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात असून विशेषत: शिवसेनेच्या लोकांना बोलूच दिलं जात नाही. शिवसेनेच्या सदस्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त के्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खालून काय इशारा करतात त्यावरुन निर्णय घेणं गंभीर बाब आहे. अजित पवार यांनाही ही माहिती आहे. अजित पवारांची सही झाली की नाही याबद्दल माझ्याकडे माहिती नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
“उद्धव ठाकरे काल विधीमंडळात होते. आमच्यासमोर काँग्रेस, शिवसेनेच्या अनेक आमदारांनी त्या प्रस्तावावर सही केली. राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत यायचं आहे,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली.