दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. तेव्हापासून शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे व टोलेबाजीचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये सध्या इंडिया आघाडीची बैठक चालू आहे. या बैठकीवरून शिंदे गटाच मंत्री दीपक केसरकर यांनी खोचक शब्दांत टीका केल्यानंतर त्यावरून आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, त्यांनी अजित पवारांचाही उल्लेख केला आहे.
काय म्हणाले होते दीपक केसरकर?
इंडिया आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करणाऱ्या काँग्रेससोबत सध्या ठाकरे गट बसल्याचा मुद्दा उपस्थित करत दीपक केसरकरांनी टीका केली होती. “बाळासाहेबांच्या मुंबईत चालू असलेली लाचारी आम्हाला मान्य नाही. सध्या जे चालू आहे ती लाचारी तुम्हाला मान्य आहे का? हा आमचा सवाल आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले होते.
सुषमा अंधारेंची टोलेबाजी
दरम्यान, दीपक केसरकरांच्या टीकेवर पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारेंनी खोचक टीका केली आहे. “केसरकर म्हणतायत हा महाराष्ट्र आम्ही लाचार होऊ देणार नाही. पण लाचार व स्वाभिमान हे शब्द आपल्या तोंडून शोभतात का हो? आम्ही राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही असं म्हणत तुम्ही इथून गेलात. अजित पवारांनी जेव्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या गाडीमागे तुम्ही पळत सुटलेले दिसलात. त्याला लाचारी म्हणतात की स्वाभिमान म्हणतात हे तुम्ही एकदा सांगितलं पाहिजे. ते शुक शुक केल्यावर पळतात तसे पळत होतात तुम्ही गाडीच्या मागे. तेव्हा केसरकर तुम्हाला कसं वाटलं बरं?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या, ट्रेनखाली उडी घेऊन आयुष्य संपवलं
“…तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल?”
“केसरकर म्हणतायत की बाळासाहेबांचा विचार तुम्ही मातीत मिसळतायत. त्यांना काय वाटत असेल वगैरे. केसरकर, कशाला इतकं मोठं मोठं बोलताय? आम्ही कुणाबरोबर बसलोय, यापेक्षा ज्या बाळासाहेबांबद्दल कुणाची बोलायची छाती नव्हती, त्यांना जेलमध्ये टाकायची भाषा करणारे आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची हिंमत करणारे छगन भुजबळ.. त्यांच्या मांडीला मांडी लावून जेव्हा तुम्ही बसता, तेव्हा बाळााहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? केसरकर, जरा खुद के गिरेबान में झाँककर तो देखिये, आप क्या हो असल में”, असंही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.
“ते म्हणाले भ्रष्टाचारी लोकांचा मेळा बसला आहे. त्यांना वाचवण्यासाठी सगळं चाललंय म्हणे. मग केसरकर, जरा तुम्ही तुमच्या एकनाथ भाऊंना आणि भाजपाला विचारा की २ दिवसांपूर्वी मोदींनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, तीच माणसं दोन दिवसांनंतर तुमच्याबरोबर बसली हा भ्रष्टाचाऱ्यांचा मेळा नव्हता का?” असा सवालही त्यांनी यावेळी केला.