महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पक्षाविरोधात बंड पुकारल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना २९ जून रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आधी सुरत आणि त्यानंतर गुवहाटीला शिंदे गटामध्ये एक एक करुन तब्बल ३७ आमदार सहभागी झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं. मात्र या साऱ्या घडामोडींदरम्यान सातत्याने एवढं मोठं बंड होईपर्यंत उद्धव ठाकरेंबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना याची कल्पना आली नाही का या प्रश्नावर सातत्याने चर्चा झाल्याचं पहायला मिळालं. मात्र याच प्रश्नावरुन आता उद्धव यांचे पुत्र आणि युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट करताना शिंदेंनी यासंदर्भातील हलचाली सुरु केल्याची चाहूल दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागली होती असं विधान केलं आहे.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? सत्तांतरणासंदर्भातील नाना पाटेकरांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “आम्ही जर…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य ठाकरेंनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यातील सत्तांतरणासंदर्भातील घडामोडींवर भाष्य केलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस बंडाला सुरुवात झाली. ज्यावेळेस हे आमदार सुरुवातीला सुरतला गेले तेव्हा एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता. तो म्हणजे मुख्यमंत्री, सरकार, सरकारी यंत्रणा ताब्यात असून सुद्धा या सगळ्या गोष्टीची तुम्हाला चाहूल सुद्धा लागली नाही. कुठेतरी संवाद होत नसल्याने तुम्हाला चाहूल लागली नाही. नक्की काय घडलं? तुम्हाला माहिती नव्हतं का असं काही होतं की तुम्हाला अवाका माहिती नव्हता? ज्या पद्धतीने होईल त्याची कल्पना तुम्हाला नव्हती का? तुम्ही सुद्धा तेव्हा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होता. मुख्यमंत्री निवासस्थानी तुम्ही राहत होता. नक्की काय झालं असं की तुम्हाला या गोष्टींचा आवाका लक्षात आला नाही? संपर्क नसल्याने हे सगळं झालं का? असा सविस्तर प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत

या प्रश्नावर उत्तर देताना, “एक महत्तवाची गोष्ट अशी आहे की गेल्या एक-दीड वर्षामध्ये आमच्या घरात चर्चा व्हायची. साधारण याची कुजबूज आम्हाला लागली होती. काही त्यांचे जवळचे लोक होते त्यांच्यावर काही वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जात होता. अनेक गोष्टी होत्या. मी दावोसला होतो त्यावेळी माझ्यासोबत सुभाष सरदेसाई आणि नितीन राऊत होते. आम्ही ८० हजार कोटींची गुंतवणूक आणली होती महाराष्ट्रात. त्याच वेळी २० मे ला एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी बोलवून घेतलं,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

नक्की वाचा >> “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेलं तरी…”; आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, “हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे…”

पुढील घटनाक्रमही आदित्य यांनी सांगितला. “तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? काय नक्की गडबड सुरु आहे? नेमकं काय सुरु आहे असं २० मे रोजी शिंदेंना उद्धव ठाकरेंनी बोलवून घेतल्यानंतर विचारलं होतं,” असा दावा आदित्य यांनी केला आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपले कान भरवले जात असल्याप्रमाणे हा सारा प्रकार होता असंही आदित्य म्हणाले. “कसं असतं की आपण एखाद्याबरोबर काम करतो तेव्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकून काम करतो. इतर कोणी आपल्या मनात काही भरण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण म्हणतो की अरे हा काय माझ्या कानात चुकीच्या गोष्टी भरवतोय. कदाचित ही व्यक्ती आमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय का? अशावेळी माझ्यासोबत आहे त्या लोकांवर मी विश्वास ठेवेन,” असं आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: “२० वर्षांपासून मशाल आमचं चिन्ह, ते आम्हाला…”; ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार? प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता

“या लोकांना उद्धवसाहेबांनी गेली १५-२० वर्ष फार पाठिंबा दिलाय. उद्धवसाहेबांची मेहनत मी स्वत: बघितली आहे. अगदी तिकीट देण्यापासून त्यांची स्थानिक पातळीवरील अंतर्गत भांडणं सोडवण्यापर्यंत मदत केलीय. एक मजेशीर गोष्ट अशी आहे की जी भांडणं होती ते आता सोबत तिथे जाऊन भांडत आहेत. निवडणुकीचा प्रचार, सत्ता नसेल तर त्यांना जपणं, सत्ता असेल तर त्यांना सर्व काही देणं जे आतापर्यंत कधीही कोणत्या मुख्यमंत्र्यांनी दिलं नसेल. एवढं सगळं प्रेम आणि विश्वास आपण एखाद्यावर ठेवतो तर तो समोरचा माणूस काय सांगतो यावर आपण विश्वास ठेवतो. आता एक मंत्री यात असे आहेत ज्यांनी शपथ खाऊन सांगितलं होतं की आमच्या हातून कधीही गद्दारी होणार नाही. दुसऱ्या दिवशी पलटी खाल्ली. दोन-तीन आमदार असे आहेत जे ‘वर्षा’वर माझा हात पकडून रडून म्हणाले आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तरीही ते तिथे गेले. नक्की कोणता दबाव होता की मोहमाया होती की काय होतं हे लोकांसमोर येत आहे,” असंही आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> “…त्या दिवशी मला फार दु:ख झालं”; उद्धव ठाकरेंसंदर्भातील ‘तो’ प्रसंग सांगत सुधीर मुनगंटीवार यांचं विधान

त्याचप्रमाणे ५० खोके एकदम ओके ही घोषणा अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्याचा दावा आदित्य यांनी केला. “५० खोके एकदम ओके हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात प्रत्येक गावपातळीवर पोहोचलं आहे. एक दोन जी दुसरी राज्य आहेत जिथे असा प्रकार होण्याचा प्रयत्न झाला. तिथल्या काही आमदारांनी, नेत्यांनी मला फोन केले आणि सांगितलं की खोके की कोशीश याहाँ भी हो रही है. हे खोक्याचं आणि धोक्याचं राजकारण किती दिवस आपल्या देशात आणि राज्यात चालणार हा एक प्रश्न आहे. आमच्याकडून सूडबुद्धीचं राजकारण कधी झालं नाही. आमच्याकडून कधी विरोधी पक्षाला तडीपारीच्या नोटीस, त्यांच्यावर वॉच ठेवणं, आमच्याच लोकांवर वॉच ठेवणं असं कधीही झालं नाही. कारण आम्ही स्वच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला. लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला,” असं आदित्य यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray family was aware about eknath shinde expected revolt says aditya thackeray scsg