महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या आमदार अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे. यासंदर्भात सविस्तर सुनावणी घेऊन निर्णय होईल, असं राहुल नार्वेकरांनी सातत्याने मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र, आता त्यावरूनच ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना लक्ष्य केलं आहे. राहुल नार्वेकरांच्या मुलाखती भगतसिंह कोश्यारींसारख्या असल्याची टीका याआधीच संजय राऊतांनी केली होती. आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल नार्वेकरांवर खोचक टीका केली आहे.
“महाराष्ट्रात सगळीच कृत्य बेकायदेशीरपणे चालू आहे. घटनेच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी घटनेची रखवाली करायची असते. ते घटनेचे चौकीदार आहेत. पण घटनेच्या पदावर बसलेल्या व्यक्तीच घटनेच्या मारेकरी ठरत आहेत. हे आपण भगतसिंह कोश्यारींच्या बाबतीत पाहिलं. सर्वोच्च न्यायालयानं राज्यपाल या संस्थेवर ताशेरे मारले”, असं राऊत म्हणाले.
“नार्वेकरांच्या मुलाखतींमधून संभ्रम निर्माण होतोय”
“महाराष्ट्र विधानसभेला एक प्रतिष्ठा आहे. ते घटनात्मक पद आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीनं निष्पक्ष पद्धतीने न्याय करायचा असतो. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अधिवेशन सध्या चालू नाहीये. पण अध्यक्ष परदेशात किंवा इथे येऊन अनेक मुलाखती देत आहेत. त्यातून संभ्रम निर्माण होतोय. यातून प्रकरणावर दबाव निर्माण होतोय की काय असं आम्हाला वाटतंय”, अशा शब्दांत संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीकास्र सोडलंय.
Video: “उद्धव ठाकरेंचा स्टॅम्पसाईज फोटो…”, देवेंद्र फडणवीसांचं टीकास्र; म्हणाले, “मुंबई पालिका हा दुसरा पोपट…!”
“विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यासमोरच्या खटल्याबाबत जाहीर मुलाखती देऊ नयेत असे घटनात्मक संकेत आहेत. न्यायमूर्ती त्यांच्यासमोरच्या खटल्याबाबत आपण काय करणार आहोत, काय करणार नाही अशा मुलाखती देत नाहीत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचं हे कर्तव्य आहे”, असं राऊत म्हणाले.
“त्यांना अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. हे सगळं घडलं तेव्हा ते तिथेच होते. आधी झिरवळ होते. झिरवळांच्या अध्यक्षतेखालीच राहुल नार्वेकर अध्यक्ष झालेत ना? अभ्यास कसला करताय? एखादा चांगला घटनातज्ज्ञ असेल तर ते संपूर्ण प्रकण २४ तासात उडवून देईल”, असंही राऊत यावेळी म्हणाले.