नव्या संसद भवनाच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या भारतीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाची हिंसक पद्धतीने सांगता झाली. ‘महिला महापंचायत’ भरविण्यासाठी संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर जंतर-मंतर येथील सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले. ऑलिम्पिक विजेते कुस्तीगीर बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट आणि विनेश फोगट यांच्यासह आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कुस्तीपटूंना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतलं. त्यामुळे देभभरातून मोदी सरकारवर आणि पोलिसांवर टीका सुरू आहे.
दिल्लीत कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, एकीकडे आपण लोकशाहीच्या मंदिराचं उद्घाटन केलं (संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन) असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचं जगभर नाव मोठं करणारे जे कुस्तीपटू लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे, त्यांना बळाचा वापर करून ताब्यात घ्यायचं, हा प्रकार निषेधार्ह आहे.
अंबादास दानवे म्हणाले, कुस्तीपटून लोकशाही मार्गाने गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहेत. त्यांनी देश-विदेशात, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या देशाचं नावं मोठं केलं आहे. परंतु त्यांना ओढून-ताणून, कोंबून, दाबून ताब्यात घेतलं गेलं. हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे.
हे ही वाचा >> “उद्धव सेना घड्याळ या चिन्हावर निवडणुका लढणार”, नितेश राणेंचा दावा; म्हणाले, “स्वतः संजय राऊत दोनदा…”
दानवे म्हणाले, खरंतर या कुस्तीपटूंच्या मागण्या फार मोठ्या नाहीत. कुस्ती संघटनेच्या प्रमुखावर (ब्रिजभूषण सिंह) त्यांचे काही आरोप आहेत. परंतु त्याला भाजपा किंवा केंद्र सरकार किंवा भारताचं ऑलिम्पिक असोसिएशन का पाठिशी घालतंय हे कळायला मार्ग नाही. भारताचं नाव मोठं करणाऱ्या या खेळाडूंना अशा प्रकारची वागणूक देणं फार चुकीचं आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने फार चुकीचं आहे. या खेळाडूंना सहज ताब्यात घेता आलं असतं. परंतु तसं केलं नाही.