मैतई समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याच्या निर्णयावरून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये आसाम रायफल्स आणि लष्कराच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच दंगलखोर दिसले की त्यांच्यावर जागीच गोळीबार करा, असे आदेशही येथील राज्यपालांनी दिले आहेत. दरम्यान, यावरून ठाकरे गटाने मोदी सरकारला लक्ष्य केलं असून मणिपुरातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचे अपयश आहे, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
हेही वाचा – “राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपात आले, तर…”, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळरावांचं सूचक वक्तव्य
ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय?
“पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे कर्नाटक निवडणूक प्रचारात धुंद आहेत व तिकडे ईशान्येतील एक प्रमुख राज्य मणिपूर अक्षरशः पेटले आहे. हिंसाचार आणि दंगलींचा भडका असा उडाला आहे की बाजूच्या इतर राज्यांतही त्याचे पडसाद उमटू शकतात, पण सदैव निवडणुका व राजकीय व्यवहारात गुंतलेल्या सरकारला याची कल्पना आहे काय?” असा सवाल करत ठाकरे गटाने मोदी सरकारवर टीका केली आहे.
“मणिपुरातील हिंसाचार हे गृहमंत्रालयाचे अपयश”
“मणिपुरातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचे अपयश आहे. देशाला गृहमंत्री आहेत; पण ते सदैव राजकीय विरोधकांच्या विरोधात कारवाया करण्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे अतिरेकी, समाजकंटक, राष्ट्रद्रोही शक्तींना मोकळे रान मिळते”, असेही ते म्हणाले.
“‘राणा’ दांपत्याला इम्फाळला पाठवून…”
“राष्ट्रीय सुरक्षेवर रामबाण उपाय म्हणून मोदी सरकारने हनुमान चालिसा पठण, बजरंगबली की जय असा मंत्रोच्चार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मणिपुरातील भडका शमविण्यासाठी ‘राणा’ दांपत्यास इम्फाळला पाठवून तेथे अखंड हनुमान चालिसा वाचावी व हिंसाचार करणाऱ्यांपुढे नमते न घेता ‘जय बजरंगबली, तोड दे दुश्मन की नली’ असा गजर करावा. मोदी-शहांच्या हिंदुत्वात शांतता प्रस्थापित करण्याचा हाच मार्ग आहे”, असा टोलाही ठाकरे गटाने मोदी सरकारला लगावला आहे.
हेही वाचा – महिनाभरात एकगठ्ठा ६४ लाख गणवेशांचा घाट कशासाठी? निर्णयाबाबत शंका, सुमारे ३८५ कोटी रुपयांची उलाढाल
“…मग तरीही मणिपूरमध्ये हिंसचार का घडला?”
“आपल्या सत्ताकाळात मणिपूरसह ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित झाली. हिंसक घटना, बंडखोरांच्या कारवाया, दहशतवादी हल्ले, जाती-जमातींमधील परस्पर संघर्ष कमी झाला, असा दावा पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत सगळेच करीत असतात. मग तरीही मणिपूरमध्ये हिंसक संघर्षाचा भडका पुन्हा का उडाला? मणिपूरमधील भडका वेळीच शमला नाही तर ईशान्य हिंदुस्थान परत एकदा अस्थिरता, अशांतता आणि फुटीरतेच्या कड्यावर उभा राहील. पण याची जाणीव जातीय आणि धार्मिक संघर्षावरच सत्ताकारण करणाऱ्या केंद्रातील आणि मणिपूरमधील सत्ताधाऱ्यांना आहे काय?” असे प्रश्नही ठाकरे गटाने विचारले आहेत.