इन्स्टाग्रामवरील एका वादग्रस्त पोस्टमुळे शनिवारी रात्री अकोला शहरातील विविध भागात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. हल्लेखोरांनी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आगीच्या भक्ष्यस्थानी केलं आहे.यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असून १० दंगलखोरांसह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दंगलीची ही घटना घडताच अकोला शहारात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिसरात कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे.
अकोला शहरातील या दंगलीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. जिथे निवडणुका असतात, तिथेच दंगली का घडतात? अस सवालही दानवे यांनी विचारला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
अकोल्यातील दंगलीवर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, “जिथे निवडणुका आहेत, तिथेच दंगली का घडतात? बाकीच्या ठिकाणी दंगली का होत नाहीत? भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक व जातीय रंग देऊन अशा दंगली भडकावण्याचा प्रयत्न करते. म्हणून मला वाटतं की, जनतेनंही सावध राहायला हवं. जनतेनं अशा कोणत्याही दंगलीत सहभागी होऊ नये. विद्यमान सरकार स्वत:च्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.”
हेही वाचा- दंगलीनंतर अकोल्यात भयाण शांतता, जाळपोळीनंतरचा व्हिडीओ आला समोर, ३० जण अटकेत, मध्यरात्री काय घडलं?
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने सांगितलं की, अकोल्यातील घटनेबाबत देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्रीपासून डीजीपी आणि अकोला पोलिसांच्या संपर्कात होते. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे. आतापर्यंत सुमारे ३० आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.