शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आताही संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. १५ ऑगस्ट हे **गे स्वातंत्र्य असलं तरी पत्करलं पाहिजे. सबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही, तोपर्यंत १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन दुःखाचाही आहे. त्या दिवशी कडकडीत उपवास करायचा, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, आमदार सचिन अहिर यांनी टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे?
“भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी ‘वंदे मातरम’ म्हणत फासावर लटकून घेतलं. ते ‘वंदे मातरम’ गीत तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही. १८९८ साली पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोर यांना ‘जन गण मन’ हे गीत सुचलं. १५ ऑगस्ट हे **गे स्वातंत्र्य असलं तरी पत्करले पाहिजे. सबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही, तोपर्यंत १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन दुःखाचाही आहे. त्या दिवशी कडकडीत उपवास करायचा,” असं संभाजी भिडे म्हणाले.
हेही वाचा : “…याची लाज सरकारला वाटायला हवी”, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल; ‘त्या’ घोषणेची करून दिली आठवण!
“…याचा निषेध करावा तेवढा कमी”
भिडे यांच्या वक्तव्यावर सचिन अहिर यांनी म्हटलं की, “ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध नसताना अशी वादग्रस्त वक्तव्य करून लक्ष वळवण्याचं काम करतात. नवीन इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, १५ ऑगस्ट काळा दिवस जाहीर करायचा, याचा निषेध करावा तेवढा कमी आहे.”
“फाळणी किंवा आणीबाणीसारखे विषय आणण्यात येत आहेत. पण, एकता आणि अखंडेसाठी जे हुतात्मे झाले, ज्यांनी बलिदान दिलं आहे; या सर्वांचा अपमान करण्याचं काम दुर्दैवाने आज होत आहे,” अशा शब्दांत सचिन अहिर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.