सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे महाराष्ट्रातील अकोला शहरात दोन गटात राडा झाला. हिंसाचाराच्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन पोलिसांसह एकूण आठजण जखमी झाले. अकोल्यातील या दंगलीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. दरम्यान, अकोल्यातील दंगलीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

भाजपाने देशभरात तणाव निर्माण करण्याचा कारखाना सुरू केला आहे. आणि दंगल घडवण्याची प्रयोगशाळा महाराष्ट्रात सुरू केली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

देशभरात तणाव निर्माण करण्याची ‘फॅक्टरी’ – राऊत

अकोल्यातील दंगलप्रकरणी विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील सध्याचं सरकार अनैतिक आघाडीतून स्थापन झालं आहे. भविष्यात लोक त्यांना स्विकारतील की नाही? याबाबत त्यांना आता भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी (भाजपा) देशभरात तणाव निर्माण करण्याची ‘फॅक्टरी’ उघडली आहे. त्या फॅक्टरीची प्रयोगशाळा महाराष्ट्रात सुरू केली आहे, असं मला वाटतंय.”

हेही वाचा- अकोल्यातील दंगलीत भाजपाचं कनेक्शन? ठाकरे गटातील नेत्याचा गंभीर आरोप; म्हणाले, “जिथे निवडणुका…”

“उद्धव ठाकरेंच्या काळात दंगली झाल्या नाहीत”

“उद्धव ठाकरेंच्या काळात दंगली झाल्या नाहीत. राज्यात कमालीची शांतता होती. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन आणि इतर मागासवर्गीय सगळे गुण्यागोविंदाने नांदायचे. पण अलीकडे कर्नाटकात तोच प्रकार घडला. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बजरंग बली, हनुमान चालीसा यासारख्या मुद्द्यावरुन राजकारण केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला. राज्य अस्थिर करून निवडणुकीला सामोरं जायचं. धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि त्याच तणावाच्या पार्श्वभूमीवर मतं मागायची, असा प्रकार देशात सुरू आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा- अकोल्यातील दंगलींचा राजकीय लाभ कुणाला? धार्मिक ध्रुवीकरणामागे कोणती राजकीय समीकरणे?

…मग मणिपूर का पेटलंय- संजय राऊत

“या दंगली कोण घडवतंय? हे सरकारला माहीत आहे. सरकारच दंगल घडवत असेल. हे विरोधीपक्ष का करेल? कर्नाटकात त्यांचंच सरकार होतं, मग दंगली कशा काय घडल्या? बिहारमध्येही त्यांनी दंगली घडवल्या. मनिपूरमध्येही त्यांचंच सरकार आहे, मग ते राज्यही का पेटलं आहे?” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.