राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देण्याच्या प्रयत्नात भाजपाने अवघ्या तासाभराच्या आतच त्यांची एक पोस्ट डिलिट केली आहे. मी पुन्हा येईन असं घोषवाक्य असलेला देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ अवघ्या तासाभरात मागे घ्यावा लागल्याने आता विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपशेल नापास गृहमंत्री ठरलेले आहेत. त्यांच्यावर जनतेची नाराजी आहे आणि पक्षश्रेष्ठींचीही नाराजी आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनाच सांगण्यासाठी की मीच पुन्हा येऊ शकतो. मीच सर्वयोग्य आहे. त्याचवेळेला महाराष्ट्राच्या जनतेलाही हेच सांगण्याचा प्रयत्न होता”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा>> “कार्यकर्त्यांना…”, ‘मी पुन्हा येईन’च्या व्हिडीओमुळे राजकीय गदारोळ वाढल्यानंतर भाजपाकडून स्पष्टीकरण, म्हणाले…
त्या पुढे म्हणाल्या की, “परंतु, ५५ मिनिटांच्या आत ट्वीट डिलिट होतं याचा अर्थ असा आहे की ५५ मिनिटांत असं काय घडलं, पक्षश्रेष्ठींकडून फोन आले का? दिल्लीतून फोन आले का? काय प्रतिक्रिया आल्या का? काहीलोक नाराज होणार होते का?” असे विविध प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
भाजपाने केलेल्या पोस्टमध्ये काय होतं?
“मी पुन्हा येईन. याच ठिकाणी, याच निर्धाराने, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!” भाजपा महाराष्ट्राने ही कविता काही वेळापूर्वीच पोस्ट केली आहे. ज्यावरुन विविध चर्चा आता सुरु झाल्या आहेत. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील का? समजा अपात्रतेचा निर्णय झाला तर पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील का? एक-ना दोन चर्चा सुरु झाल्या आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्र भाजपाने ही कविता पोस्ट केल्यानंतर त्यातल्या उत्तरांमध्येही लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स तर शपथविधी सोहळा कधी आहे? असाही प्रश्न विचारत आहेत.
भाजपाकडून सारवासारव
“हा व्हिडीओ सोशल मीडिया मर्यादित आहे”, असं केशव उपाध्ये म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकदा टाकला गेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते. या आधीच माननीय देवेंद्रजीनीच स्पष्ट केले आहे की,एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.