Vinayak Raut : महायुती सरकारने राज्यातील पालकमंत्री पदाची यादी शनिवारी जाहीर केली. मात्र, यामध्ये महायुतीमधील काही मंत्र्यांना डावलण्यात आलं. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे महायुतीमधील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. यातच उदय सामंत यांच्याबाबत विरोधकांनी केलेल्या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे.
‘एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच शिवसेनेत ‘उदय’ होणार होता’, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात उलटसूलट चर्चा रंगली. असं असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. “येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय जनता पक्ष अजित पवार गटाला आणि शिवसेना शिंदे गटाला घरचा रस्ता दाखवणार आहे”, असं मोठं विधान विनायक राऊत यांनी केलं. त्यांच्या या विधानाची चर्चा रंगली असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होणार का? याबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
विनायक राऊत काय म्हणाले?
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली. ‘नारायण राणे आणि मराठा समाजाचा संबंध काय? मराठा समाजाच्या नेत्यांना बोलणारा एकमेव माणूस म्हणजे नारायण राणे आहेत. त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की ते राजस्थानी आहेत’, असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला.
भरत गोगावलेंच्या नाराजीबाबत राऊत काय म्हणाले?
महायुतीमधील पालकमंत्री पदाच्या यादीतून डावलण्यात आल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी बोलून दाखवली होती. याबाबत बोलताना विनायक राऊत यांनी म्हटलं की, “महायुतीच्या सरकारमध्ये फक्त भरत गोगावले यांची गोची झालेली नाही, तर एकनाथ शिंदे यांची देखील गोची भविष्यात होणार आहे”, असं म्हणत विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही खोचक टीका केली.
उदय सामंतांवर खोचक टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंत यांच्याबाबत सूचक भाष्य केलं होतं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. आता विनायक राऊत यांनीही उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “स्वतःचे घर सावरायच्या ऐवजी दुसऱ्याचे घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षांमध्ये उडी घेणारे उदय सामंत यांनी आधी ते कुठल्या पक्षात उडी घेतल्यावर स्थिर होणार ते सांगायला हवं”, असं म्हणत विनायक राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.