राज्याचं अधिवेशन सुरु झाल्यापासूनच विरोधकांमध्ये आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंमध्ये छोटे-छोटे वाद सुरु आहेत. विरोधकांनी परवा टीम इंडियाच्या सत्काराला आम्हाला बोलवलं नाही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरुन गदारोळ घातला होता. तेव्हा वाद मिटवताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या मी तुम्हाला सरकारच्या वतीने निमंत्रण देते तुम्ही नक्की या. आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे नवनिर्चित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नीलम गोऱ्हे यांना अनिल परब यांनी चूक लक्षात आणून दिली. त्यावर नाराजीही व्यक्त केली ज्यानंतर नीलम गोऱ्हेंनी मी अनावधानाने बोलून गेले म्हटलं आहे.
पावसामुळे सभागृहात सदस्यांची उपस्थिती कमी
मुंबईत रात्री उशिरापासून जोरदार पावसाची हजेरी आहे. अनेक मंत्री, आमदार यांना अधिवेशनात पोहचता आलं नाही. त्यामुळे आज विधान परिषदेत आणि विधानसभेतलं कामकाज रोजच्या प्रमाणे चाललं नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज उद्या सकाळी ११ पर्यंत तहकूब केलं आहे. तिकडे विधान परिषदेत मात्र अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात छोटासा वाद निर्माण झाला.
नेमकं काय घडलं सभागृहात?
अनिल परब म्हणाले, “उपसभापतींनी आमच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. उपसभापती दोन दिवसांपूर्वी म्हणाल्या की तुम्ही सभागृहात गोंधळ घालता कारण तुम्हाला उद्धव ठाकरेंना तुम्ही काय काम करता हे दाखवायचं असतं. मग आता मी हे म्हणू का? की तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनना काय किती काम करता ते दाखवायचं असतं म्हणून तुम्ही आम्हाला बोलू देत नाही. असं म्हटलं तर तुम्हाला किती राग येईल?” असं अनिल परब म्हणाले.
उद्धव ठाकरेंना माझं काम माहीत आहे
पुढे अनिल परब म्हणाले, “मी काम करतो हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. म्हणूनच त्यांनी मला चारवेळा आमदार केलं आहे. हेच तुमच्याबाबत बोललो तर तु्म्हाला राग येईल. माझ्याबाबत तुम्ही जे वक्तव्य केलं ते वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाका.”
तर मी ते वक्तव्य काढून टाकते..
यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, “मी तुमच्याविषयी अनावधानाने काही बोलून गेले असेन. मी तसं काही बोलले आहे का हे तपासून काढून टाकते.” असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी अनिल परब यांना ते वक्तव्य काढून टाकण्याचं आश्वासन दिलं आहे. अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाच्या किरण शेलार यांचा पराभव केला आहे. आज त्यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषदेतलं कामकाज चर्चेत राहिलं.