शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी आमदार नाईकांना पदावरून हटवलं आहे. वैभव नाईक यांच्या उचलबांगडीनंतर सिंधुदुर्गात तीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. आमदार नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने, त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैभव नाईक यांना पदावरून हटवल्यानंतर संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने नियुक्ती करण्यात आलेले सदस्य पूर्वीचे राणे समर्थक असल्याचं बोललं जात आहे. या सर्वांवर आता वैभव नाईक यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “ठाकरे गट किती दिवस जिवंत ठेवायचा हे…”, नितेश राणेंचा इशारा

प्रसारमाध्यमांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, “शिंदे गट आणि भाजपात येण्यासाठी अनेकजण दबाव टाकत आहेत. तरीही दबावाला झुगारून कोणत्याही पक्षात जाणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे जिल्हाप्रमुख होतो. नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे.”

“आता जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काम करत आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी जबाबदारी ही काढून घेतली असेल. त्यामुळे शिवसेना वाढवण्यासाठी जे-जे काम करावे लागेल ते करणार आहे,” अशी स्पष्टोक्ती वैभव नाईक यांनी दिली आहे.

हेही वाचा : शितल म्हात्रेंच्या ‘त्या’ आरोपांना प्रियंका चतुर्वेदींचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आमचं नाव घेऊन…”

सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल बोलताना वैभव नाईकांनी सांगितलं, “सदानंद कदम यांचा ईडीशी काही संबंध नाही. खेडच्या मेळाव्यात सदानंद कदम यांनी बॅनर लावल्याने त्यांच्या कारवाई करण्यात आली. मात्र, किती लोकांवर कारवाई करत अटक करणार, किती दिवस जेलमध्ये टाकणार हा प्रश्न आहे. या कारवाईनंतर जनता आपला रोष व्यक्त करेल, म्हणून ही लोक निवडणुकीपासून लांब पळत आहे,” असेही वैभव नाईक यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group mla vaibhav naik remove sindhudurg district chief post ssa