शिवसेनेने ( ठाकरे गट ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं फेरबदल केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून आमदार वैभव नाईक यांना हटवलं आहे. खासदार विनायक राऊत यांनी ही उचलबांगडी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. पण, तीनही सदस्य पूर्वीचे राणे समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
“ठाकरे सेना राणे समर्थकांकडेच आहे. आमचे सर्व माजी समर्थक ठाकरे सेनेचं नेतृत्व करतात. त्यातील तीन मधून दोन तर शिंदे गटात जाण्यासाठी एका पायावर तयारीत आहे. तिसरा आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची हे आमच्यावर आहे. आम्ही ठरवू तेव्हा व्हेंटिलेटरची वायर काढून टाकू,” असं विधान नितेश राणेंनी केलं आहे. याला आता वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा : वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी, शिंदे गटात जाणार? म्हणाले…
प्रसारमाध्यमांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, “नितेश राणेंचं अस्तित्व एवढं मोठं नाही की, त्यांच्या संपर्कात कोण असेल. त्यांचेच कार्यकर्ते भाजपा आणि रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राणेंचं जिल्ह्यातील राजकीय अस्तित्व संपत चाललं आहे. राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळावं.”
“शिवसेनेचे कार्यकर्ते कितीही अडचणी आल्या तरीही पक्षाबरोबर ठाम राहिले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोणीही फोडू शकणार नाही. कारण, विश्वासाने ते उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आहेत,” असं वैभव नाईक यांनी सांगितलं.
“दोन महिन्यांत राणेंना मंत्रीपदाचा…”
“नारायण राणेंचं राजकीय अस्तित्व भाजपा ठरवणार आहे. यापूर्वी राणे लोकांचं आणि पक्षाचं अस्तित्व ठरवत होते. आता परिस्थिती बदलली आहे. महिन्यापूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेला भाजपाचा मेळावा, ही राणेंना वगळून वाढलेली ताकद दाखवण्यासाठी होता. भाजपाला राणेंची गरज संपली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत राणेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे,” असं भाकीत वैभव नाईक यांनी वर्तवलं आहे.