लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाले आहे. भारतीय जनता पार्टीला २४० जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला मिळून २९३ जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत तब्बल ३० जागा मिळवल्या. यामध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गटात आनंदाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस मोठा भाऊ ठरला असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान करत काँग्रेसला इशारा दिला आहे. तसंच विधानसभेचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कसा असेल? यासंदर्भातही सूचक भाष्य केलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“कोणीही लहान आणि कोणीही मोठा भाऊ नाही. महाराष्ट्रात शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. आम्ही अत्यंत संघर्षातून आणि संकटातून पक्ष उभा केला आहे. लोकसभा निवडणुकीत जागा लढवल्या आहेत. काँग्रेससमोर तसं संकट नव्हतं. त्यांचं चिन्ह आणि पक्ष हा त्यांच्याकडे होतं. आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आहे. आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा, असं ठरलं आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
नाना पटोले काय म्हणाले?
“आम्ही लोकसभा निवडणुकीतदेखील मोठ्या भावाची भूमिका निभावली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्याबरोबर असलेले आधी गट होते आता पक्ष झाले आहेत. महाराष्ट्रात आमचा जेव्हा एक खासदार होता, तेव्हाही आम्ही मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे. आजही निभावत आहोत. मात्र, लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला होता. त्यावर आज संजय राऊत यांनी सूचक भाष्य केलं.
पटोलेंचेच्या त्या बॅनरबाजीची चर्चा
राज्यात जनतेने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल दिला आहे. तब्बल ३० जागा या महाविकास आघाडीच्या पारड्यात जनतेने टाकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच जल्लोष केला. अशातच काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले होते. त्यामुळे या बॅनरची राज्यात चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, महाराष्ट्रात काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला लोकसभेत यश मिळाल्यानंतर आता विधानसभेकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विधानसभेचा फॉर्म्युला काय असेल? याबाबत जी जागा जो जिंकेल, ती त्याची असं म्हणत सूचक राऊतांनी केलं आहे.