महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यात वर्तमान पत्रांमध्ये आज एक जाहिरात देण्यात आली आहे. ही जाहिरात एका सर्व्हेची आहे. राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असं शीर्षक या जाहिरातीला देण्यात आलं आहे. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असं दाखवलं गेलं आहे. या सगळ्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

जाहिरात कुणाची आहे? ते बघावं लागेल. १०५ आमदारांचा पाठिंबा असलेल्या भाजपाने यावर उत्तर द्यायचं आहे. आम्ही काय बोलणार? एका सर्व्हेची जाहिरात कोट्यवधी रुपये खर्च करुन देण्यात आली आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच हा सर्व्हे नक्की कुठे केला? महाराष्ट्रातला हा सर्व्हे केला असेल असं वाटत नाही. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांपुरता हा सर्व्हे असावा किंवा गुजरातमधला असावा. हा सर्व्हे खरा की खोटा यात आम्हाला पडायचा नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “भविष्यात शिंदे गटाचे आमदार भाजपात जातील”, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत

एवढ्या मोठ्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो का नाही?

स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणणाऱ्यांनी मोदींचा फोटो जाहिरातीत दिला आहे मात्र बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. कोट्यवधींच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेखही नाही. त्यामुळेच ही शिवसेना ही शिवसेना नसून मोदी शाह यांची सेना आहे हे स्पष्ट झालं आहे. रोज बाळासाहेबांच्या नावाने जी पोपटपंची सुरु आहे ना? त्यांचा मुखवटा उघडा पडला आहे. एकनाथ शिंदेंची सेना ही मोदींच्या टाचेखालची सेना आहे. अमित शाह यांची सेना आहे. बाकी सर्व्हेबाबत आम्ही काही बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी नेते उत्तर देतील. एकनाथ शिंदेंचा गट आणि भाजपा यांनी एकमेकांमध्ये कुस्ती खेळावी, मल्लखांब खेळावा, खोखो खेळावा आम्हाला काही घेणंदेणं नाही. दोन हजारांच्या नोटांचे खोके बाहेर काढून हा खर्च झाला आहे का? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group mp sanjay raut slams eknath shinde on the survey and ask question about balasaheb thackeray scj