संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणीही सुरु आहेत. ही जी माहिती मला सूत्रांनी दिली आहे त्यांनी हे पण सांगितलं की जर तुम्ही संजय राऊत यांची शरद पवारांच्या राजीनाम्याच्या वेळीची भूमिका पाहिली किंवा त्याआधीची भूमिका पाहा ते अजित पवारांवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची अटच अशी आहे की अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो असं संजय राऊत यांनी शरद पवारांना सांगितलं आहे. हा खळबळजनक दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, “संजय राऊत यांनी असं कळवलं आहे की आता काय उद्धव ठाकरेंचं काही खरं नाही. त्यांचा स्वतःचा पक्ष राहिलेला नाही. मला उद्धव ठाकरेंसोबत राहण्यास अर्थ वाटत नाही त्यामुळे तुम्ही मला राष्ट्रवादीत घ्या” हे सगळं संजय राऊत यांनी शरद पवारांना सांगितल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे. १० जून पर्यंत संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असाही दावा नितेश राणेंनी केला आहे. ज्या दिवशी शरद पवार यांनी राजीनामा परत घेतला तेव्हा संजय राऊत यांना त्यांच्यासोबत जायचं होतं. त्यावेळी शरद पवार हे संपर्कात येत नव्हते असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
आम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंना सांगत होतो की संजय राऊत साप आहे. हा ना बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला ना तुमचा होणार. बाळासाहेब ठाकरे असताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये भांडणं लावली. उद्या जेव्हा संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतील तेव्हा त्यांचे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील. या एका माणसामुळे तुम्ही किती लोकांना तोडलंत. असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा राहुल गांधी, एम. के. स्टॅलिन यांच्यापासून सगळ्या लोकांनी शरद पवारांना फोन केला आणि आपण राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण उद्धव ठाकरेंनी असा काही आग्रह धरला होता असं तुम्ही ऐकलंत का? उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत का? असाही प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.