शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. शिवतीर्थ आणि ठाकरे समीकरणच आहे. मराठवाड्यात म्हणतात कुठलीही गोष्ट खानदानी लोकांनीच करावी. गद्दारांनी दसरा मेळाव्याबाबत बोलूच नये. दसरा मेळावा ही परंपरा बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केली होती. उद्धव ठाकरेंनी पुढे नेली अशी टीका ठाकरे गटाच्या सोशल मीडिया प्रमुख अयोध्या पौळ यांनी नांदेडमध्ये केली आहे आणि एकनाथ शिंदेंना एकनाथ मामा म्हणत टोलाही लगावला आहे.उद्धव ठाकरे काय बोलणार? या विचारातून बहुदा लाडक्या एकनाथ मामांनी बीपीच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केलेली दिसते आहे. असंही त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या अयोध्या पौळ?
“शिवतीर्थ आणि ठाकरे हे समीकरण आहे. मी आत्ता मराठावाड्यात आहे त्यामुळे इथली एक म्हण सांगते. कुठलीही गोष्ट खानदानी माणसाने करावी. घरबसवे जे गावाच्या बाहेर असतात त्याप्रमाणेच गद्दारांनी दसरा मेळाव्याबाबत बोलूच नये. दसरा मेळाव्याची परंपरा बाळासाहेबांनी सुरु केली. उद्धव ठाकरेंनी ही पुढे सुरु ठेवली. गद्दारांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. १३४ वेळा आणि म्हणूनच म्हणाले. त्यांच्याकडे स्वतःचे विचार नाहीत. आमदार आणि खासदारही ते आमचेच घेऊन गेले आहेत. त्यांच्याकडे स्वतःचं काहीच नाही. आहेत ते फक्त अंगावरचे कपडे आहेत. तेदेखील शिवसेनेने त्यांना संधी दिली म्हणून त्यांना परिधान करता येतात.”
हे पण वाचा मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर महानगरपालिकेची ठाकरे गटाला लेखी परवानगी
एकनाथ मामांनी बहुदा ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरु केल्या असाव्यात
” माझ्या लाडक्या एकनाथमामांना (मुख्यमंत्री) मी सांगू शकते, आम्ही राष्ट्रवादीबरोबर बसू शकत नाही असं तुम्ही म्हणाला होतात, आज राष्ट्रवादीला तुम्ही मांडीवर घेऊन बसला आहात. उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार या विचारांतून बहुदा एकनाथ मामांनी आता बी.पी.च्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली असेल. ” असाही टोला अयोध्या पौळ यांनी लगावला.
यंदाही शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाली निघाला आहे. २४ ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. याबाबत अयोध्या पौळ यांना विचारलं असता त्यांनी एकनाथ मामा म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.