महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण सध्या तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद चिघळला असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगू लागला आहे. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे वाद सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये कलगीतुरा सुरू झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे. आज नवी मुंबईत बोलताना चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना लक्ष्य केल्यानंतर आता अंधारेंनीही त्यावर खोचक शब्दांत प्रत्युत्तर देणारं ट्वीट केलं आहे.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना नक्कल करून टाळ्या मिळवत असल्याचा टोला लगावला.”प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आमची नक्कल करून त्या शिट्ट्या आणि टाळ्या मिळवतात. मात्र मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले हे जरा महाराष्ट्राला सांगा. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काहीही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत, आम्ही आमचे काम करत राहू. असे कितीही आडवे आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे नाव घेऊन त्यांचे दुकान चालत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”
दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवर सुषमा अंधारेंनी ट्वीट करून खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाणसारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्या चित्रा वाघ यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं”, असा सल्ला सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना ट्वीटमधून दिला आहे.
दरम्यान, हा सल्ला देतानाच अंधारे यांनी चित्रा वाघ यांना खोचक टोलाही लगावला आहे. “अरेच्च्या.. विसरलेच.. सध्यातुमच्या मताला किंमतच नाहीये!!!” असं अंधारेंनी ट्वीटमदध्ये नमूद केलं आहे.