गेल्या काही दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यामुळे त्यावरूनही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारविरोधात रान उठवलं असताना सुषमा अंधारे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीकास्र सोडलं आहे. शिवाय, राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही? असा परखड सवालही सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.
“ये पब्लिक है, सब जानती है”
अब्दुल सत्तार, संभाजी भिडे यांच्या विधानांवरून सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं आहे. “त्यांच्या कारकिर्दीत पाच वेळा संसदरत्न प्राप्त केलेल्या महिलेबद्दल जर मंत्रीच गरळ ओकत असतील, संभाजी भिडे माध्यम प्रतिनिधींबद्दल असभ्य वर्तन करत असतील, जबाबदार पदाधिकारी म्हणून माझ्याबद्दल गुलाबराव पाटील बोलत असतील आणि त्यावर असं बोलू नये इतक्या गुळगुळीत भाषेतली मखलाशी गृहमंत्री करत असतील, तर याचा अर्थ सरळ आहे. ये पब्लिक है, ये सब जानती है. अंदर क्या है, बाहर क्या है”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
पाहा व्हिडीओ –
काय म्हणाले होते संभाजी भिडे?
शिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला उद्देशून केलेल्या विधानाचीही जोरदार चर्चा झाली. या महिला पत्रकाराने संभाजी भिडेंना प्रश्न विचारताच, “तू आधी टिकली लाव, मग मी तुझ्याशी बोलेन”, असं म्हणत संभाजी भिडेंनी तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून भाजपाकडून याविषयी स्पष्टीकरण मागितलं जात आहे.
“मी किरीट सोमय्यांची शिष्य व्हायला तयार, पण…”, सुषमा अंधारेंचा खोचक टोला!
“मला फडणवीसांची काळजी वाटतेय”
दरम्यान, यासंदर्भात बोलताना सुषमा अंधारेंनी मला फडणवीसांची काळजी वाटत असल्याचा खोचक टोला लगावला. “सगळ्याच बाबींवर मी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतेय की गृहमंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? त्यांची अडचण अशी होतेय की त्यांच्यावर कामाचा ताण फार आहे. मला देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटतेय. शेवटी बहीण आहे मी त्यांची. सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद, गृहमंत्रीपद, एवढी सगळी खाती, उपमुख्यमंत्रीपद…माणसानं किती बिचाऱ्यानं काम करायचं. त्यांनी थोडा ताण कमी केला पाहिजे. गृहमंत्रीपद त्यांना झेपत नाहीये हे लक्षात येतंय. त्यांनी ते दुसऱ्या कुणाकडेतरी सोपवलं पाहिजे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.