फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून लोकांनी पसंती दिल्याचा सर्व्हेक्षणाचा अहवाल शिंदे गटाने काल (१३ जून ) जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केला. या जाहिरातीवरून काल दिवसभर विरोधकांनी शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केलं. आता ठाकरे गटानेही त्यांच्या मुखपत्र असलेल्या सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न एका जाहिरातीचा नाही

“महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकार हे अजब असे जाहिरातबाज सरकार आहे. आतापर्यंत या सरकारने स्वतःच्या जाहिरातबाजीवर साधारण 786 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केल्याचे उघड झाले आहे. खर्च केले यापेक्षा जाहिरातबाजीवर जनतेचे पैसे उधळले असेच म्हणावे लागेल. आतापर्यंत या बेकायदा सरकारने असंख्य जाहिराती दिल्या, पण काल मिंधे गटातर्फे प्रसिद्ध झालेल्या एका पूर्ण पान जाहिरातीने फडणवीसांसह त्यांच्या 105 आमदारांच्या काळजाचे पाणी पाणीच झाले आहे. सर्वच वृत्तपत्रांत कोटय़वधी रुपये खर्च करून अगदी पहिल्या पानावर ‘मोदी-शिंद्यां’च्या फोटोसह जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्या जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस गायब आहेत. ही जाहिरात सरकारी नसून चोरलेल्या बनावट शिवसेनेची आहे, असं टीकास्त्र ठाकरे गटाने सोडलं आहे.

…जाहिरातीत फडणवीस कोठेच नाहीत

“जाहिरातीत पंतप्रधान मोदी यांचा फोटो खुबीने वापरला, पण फडणवीस कोठेच नाहीत. जाहिरात सरकारी नसल्यामुळेच फडणवीसांवर फुली मारली असा त्यावर खुलासा असेल, तो तितकासा खरा नाही; पण ‘आम्हीच खरी शिवसेना व आम्हीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार’ असे ढोल पिटणाऱ्यांच्या या जाहिरातीत मोदी आहेत, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील पूर्णपणे गायब आहेत. यावर भाजप व शिंदे गटाच्या टिल्ल्या-चिल्ल्या टिनपाट प्रवक्त्यांचे काय म्हणणे आहे? एकाच वेळी फडणवीस यांना धक्का देणाऱ्या व शिवसेनाप्रमुखांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जाहिरातींचे प्रयोजन काय? प्रश्न एका जाहिरातीचा नाही, तर स्वतःस शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांनी त्यांचा गट मोदींच्या पायाशी लीन करून ठेवला हा आहे. बाळासाहेब ठाकरे वगैरे काही नसून ‘सब कुछ मोदी’ असेच या शिंदेछाप जाहिरातीने सांगितले. जाहिरात सांगते, ”राष्ट्रात मोदी व महाराष्ट्रात शिंदे!” याचा अर्थ मिंधे गट फडणवीसांचा 105 आमदारांचा ‘टेकू’ मानायला तयार नाही”, अशीही टीका यातून करण्यात आली आहे.

“दुसरे असे की, कोणत्या तरी न झालेल्या सर्वेक्षणाचा हवाला देऊन जाहिरातीत सांगितले आहे, ”श्री. एकनाथजी शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे व श्री. देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे.” याचा अर्थ असा की, गेल्या फक्त 9-10 महिन्यांत शिंदे यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत फडणवीस यांच्यावर चढाई केली. मोदी राष्ट्रात व शिंदे महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत असल्याच्या जाहिरातबाजीने भाजपवाल्यांची तोंडे महाराष्ट्रात काळी ठिक्कर पडली आहेत. एक वर्षापूर्वी ‘देशात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र’ असा प्रचार सुरू होता. तो प्रचार या जाहिरातीने संपुष्टात आणला”, असा प्रहारही ठाकरे गटाने केला.

बहुधा तीन बंगल्यांत हा सर्व्हे केला

“सत्य असे की, भाजप व मिंधे गटात चढाओढीचे राजकारण सुरू झाले असून आपल्या लोकप्रियतेबाबत केलेली जाहिरातबाजी हे मिंधे गटाचे उसने अवसान आहे. मुळात फुटीर मिंधे गटास लोकांचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा किती व कसा हे अजमावयाचे असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका हाच पर्याय आहे, पण ‘मिंधे’ मंडळ निवडणुकांपासून पळ काढत आहे. ज्या ‘सर्व्हे’चा हवाला दिला जात आहे तो नक्की कोठे केला? मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताब्यात मलबार हिलचे तीन सरकारी बंगले आहेत. बहुधा याच तीन बंगल्यांत हा सर्व्हे केलेला दिसतो. मुळात जे अधिकृत ‘सर्व्हे’ प्रतिष्ठित माध्यम समूहांनी मधल्या काळात केले, त्यात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने तीन टक्के लोकांनीही कौल दिलेला दिसत नाही. मग हे 26.1 टक्के जनमत खोके देऊन खरेदी केले काय, असा प्रश्न लोकांना पडू शकतो. शिंदे यांनी गेल्या नऊ-दहा महिन्यांत कोणते दिवे लावले की, राज्यातील 26 टक्के लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला?”, असा सवालही त्यांनी या माध्यमातून उपस्थित केला.

बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का?

“शिवसेनाप्रमुखांना फक्त 10 महिन्यांत विसरणाऱ्या या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? मिंधे गटाची फुकाची जाहिरातबाजी म्हणजे वरवरची रंगसफेदी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही. चला एक बरे झाले, शिवसेनाप्रमुखांबाबतचे यांचे प्रेम व आदर म्हणजे निव्वळ ढोंग होते हे कालच्या जाहिरातबाजीने स्पष्ट केले, पण जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का? आतापर्यंत आपण सगळय़ांनी खूप कल्पक जाहिराती पाहिल्या असतील, पण अशी जाहिरात होणे नाही! “, अशीही टीका यातून करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group targeted to shinde group over advertisement sgk
Show comments