लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या. तर एनडीएसह भाजपाने २९३ जागा मिळवल्या आहेत. या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी पार पडला. नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. तसंच ७१ खासदारांना शपथ देण्यात आली. रक्षा खडसे यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यावरुन सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर टोलेबाजी करण्यात आली आहे. तसंच नरेंद्र मोदी आणि भाजपावरही टीका करण्यात आली आहे.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?

बहुमत गमावलेल्या भाजपाने एनडीएचा पिसारा फुलवून सत्ता स्थापन केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ रविवारी संध्याकाळी घेतली. हे सरकार मोदींचं नाही तर रालोआ म्हणजेच एनडीएचे आहे, असं मोदी वारंवार भाषणांतून सांगत आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंना खुश करण्याची आणि मिठ्या मारण्याची एकही संधी नरेंद्र मोदींनी गेल्या सात दिवसांत सोडलेली नाही. असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

हे पण वाचा- मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर एकनाथ शिंदेंची खास पोस्ट, “…उराशी बाळगलेलं स्वप्न”

ही तर देवेंद्र फडणवीसांना चपराक

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्यांच्यासह भाजपा आणि घटक पक्षांतील काहींनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे ही नावं आहेत. महाराष्ट्रातून रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली. रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळातला प्रवेश ही फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कपटी राजकारणास दिल्लीने लगावलेली चपराक आहे. त्यासाठी विनोद तावडेंनी विशेष श्रम घेतलेले दिसत आहेत. महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री वगैरे होतील असे फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते ते यावेळी घडले नाही. नारायण राणे, भागवत कऱ्हाड यांना मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला आहे. तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेडचे खासदार मंत्रिमंडळात आले आहेत. असं म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे.

मोदी मित्रपक्षांना मिठ्या मारण्याचे नाटक करत आहेत

तेलुगू देसमच्या दोन मुख्य मागण्या आहेत. एक म्हणजे अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रीपद असता कामा नये व लोकसभेचे स्पीकरपद तेलुगू देसमकडे असावे. या दोन्ही मागण्या म्हणजे मोदी सरकारचे कान आणि नाक कापण्यासारख्या आहेत. तेलुगू देसमला अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. कारण सरकार स्थिरस्थावर झाल्यावर अमित शाह हे त्यांचा जुनाच खेळ सुरु करतील व संसदेतला तेलुगू देसम पक्ष फोडतील. नितीश कुमार यांनाही तेच भय आहे. त्यामुळे लोकसभेच्या ‘स्पीकर’पदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा नेता असावा, अशी मागणी जोर धरत आहे. याचा अर्थ नवे सरकार हे अविश्वासाच्या पायावर बनले आहे. मोदी हे रालोआच्या नेत्यांना मिठ्या मारण्याचे नाटक करीत असले तरी त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. हे लोक विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असेच नितीश व चंद्राबाबूंना वाटत आहे आणि हेच सरकारच्या अस्थिरतेवर शिक्कामोर्तब आहे, असा अंदाज ‘सामना’तून व्यक्त करण्यात आला आहे.