Sanjay Raut on Corporation Elections 2025 : राज्यातील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीकरता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष महाविकास आघाडीतून न लढता स्वतंत्र लढणार आहे. परंतु, ही नीती केवळ मुंबईपुरती असणार की संपूर्ण राज्यभर वापरली जाणार याबाबत पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नव्हती. यावर आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “आज पुणे किंवा पिंपरी चिंचवड भागातील पदाधिकाऱ्याच्या बैठका आहेत. विधानसभा, लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. लोकसभेत आम्ही जिंकलो, विधानसभेत पराभूत झालो. त्याची कारणं देशाला समजली आहेत. त्या पराभवाने खचून न जाता पुढील सर्व निवडणूका आम्हाला लढवाव्याच लागतील, त्यासाठी तयारी सुरू आहे. ”
कार्यकर्त्यांच्या भूमिका लक्षात घेणार
“स्वबळाचा नारा दिलाय याचा अर्थ महाविकास आघाडी संपली किंवा तुटली असा काढता येणार नाही. हा विषय मुंबईपुरता आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, त्या मुंबईवर अनेक वर्षांनी शिवसेनेचा पगडा आहे. शिवसेनेने इथे सातत्याने आपली पकड ठेवली आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर स्वबळावर लढलं पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना पक्ष प्रमुखांनी व्यक्त केली आहे, ही परिस्थिती इतर शहरात किंवा जिल्ह्यात असेल का याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे तिथे तीनही पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की एकत्र लढणं गरजेचं आहे, तिकडं त्या-त्या कार्यकर्त्यांच्या भूमिका लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ”, असे संजय राऊत म्हणाले.
तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेणार
तसंच, “प्रत्येकाच्या काही भूमिका आहे. कोणी म्हणतं स्वबळावर लढलं पाहिजे, काहीजण म्हणतात की महाविकास आघाडीबरोबर राहिलं पाहिजे. पण मुळात प्रत्येक बुथवर मजबुतीने काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही महानगर पालिका ताकदीने लढवू. मुंबईची परिस्थिती, रचना आणि विषय वेगळे आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली. इंडिया आघाडी लोकसभेसाठी निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काय करायचं याबाबत तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते बसून निर्णय घेतील”, असंही ते पुढे म्हणाले.