लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाने पदवीधरसाठी नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आल्याचा आरोप अनिल परबांनी केला. आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

“शिवसेनेने ज्या नावांची नोंदणी केली होती त्यामध्ये बरीचशी नावे आलीत. पण काही आली नाहीत. पण जी नावे आली नाहीत त्यांचे आम्ही कारणे विचारले. त्याची कारणं आम्हाला सांगितली गेली. पण आता जो सप्लिमेंटरी रोल खूप अगोदर यायला पाहिजे होता, तो चार दिवसांआधी प्रसिद्ध झाला. या सप्लिमेंटरी रोलमध्ये आम्ही जी हजारो नावे नोंदवली होती, नाव नोंदवताना तो फॉर्म भरल्यानंतर आमचा फॉर्म चेक केला जातो. चेक केल्यानंतर आम्हाला ती स्लिप दिली जाते. याचा अर्थ असा आहे की, मी फॉर्म भरला आहे. तो फॉर्म चेक करुन सबमीट झाला तरच मला स्लिप दिली जाते. फॉर्म ज्यावेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला काही त्रुटी नोंदवल्या जातात. कोणती कागदपत्रे नाहीत, याबद्दल माहिती दिली जाते. अशी फॉर्म नाकारण्याची कारणे तिथेच सांगितली जातात”, असं अनिल परब म्हणाले.

हेही वाचा >> “रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”

ऑनलाईन रजिस्ट्रेनशचा स्वीकारही होत नाही

“आता जो ४० हजारांचा रोल आला त्यामध्ये आमच्या पक्षाची नावे ही ठरवून बाद केली आहेत असं चित्र आम्हाला दिसत आहे. म्हणजे आपल्यासमोर काही चिठ्ठ्या दिसत आहेत, आमच्याकडे खूप स्लिप्स आहेत, ज्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेल्याची अॅकनॉलेजमेंट (पोचपावती) आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं तर त्याचा स्वीकार होत नाही. माझ्या स्वत:च्या मुलीचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे. माझ्या घरातील असे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत. अपलोड झाले आहेत, त्याची पोचपावती आली आहे. पण कुठलंही कारण न देता, मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाने नोंदवलेली नावे कट झाली आहे. भाजपाने नोंदवलेली सर्व नावे आली आहेत, असा आमचा आरोप आहे”, असंही परबांनी पुढे स्पष्ट केलं.

“हा घोळ आपल्यासमोर आणण्याच्या अगोदर आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तिथे कुलकर्णी नावाचे अधिकारी आणि कलेक्टर होते. आम्ही त्यांच्यासमोर सगळ्या बाजू मांडल्या. आमचा अर्ज नाकारण्यामागील कारण विचारलं. आता चार-पाच दिवस राहिले आहेत. सर्वांना मतदान करायला मिळायला हवं, अशी मागणी आम्ही केलेली आहे. आता ते काय करतात ते बघू. पण जी नावे आमच्या पक्षाकडून गेली आहेत ती ठरवून बाद करण्यात आली आहेत”, असा आरोप अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला.