राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी पक्षावरील नाराजी अधूनमधून व्यक्त केली आहे. ते लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, महायुतीने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर ते राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अग्रही होते. परंतु, पक्षाने त्यांच्याऐवजी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवारानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा वरचष्मा आहे. यामुळे भुजबळांच्या मनात खदखद असल्याचं सांगितलं जातंय. अशातच छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडून शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागली आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, पूर्वी एकेकाळी छगन भुजबळ शिवसेनेत होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसनंतर ते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आणि आता ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. आता त्यांचं शिवसेनेची कोणतंही नातं उरलेलं नाही. त्यामुळे ते शिवसेनेत येण्याबद्दल ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या खोट्या आहेत. भुजबळ शिवसेनेत येण्याची चर्चा खोटी असून सर्व बातम्या चुकीच्या आहेत. आमच्यात कुठलीही चर्चा नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो. छगन भुजबळांबद्दल खोटा दावा करून मला वातावरण बिघडवायचं नाही. ते शिवसेनेत होते तेव्हा मोठे नेते होते, ते आमचे नेते होते. ते आमच्या पक्षात टिकून राहिले असते तर आज मुख्यमंत्री झाले असते. किंवा ते कुठल्याही दुसऱ्या एका पक्षात टिकून राहिले असते तर ते राजकारणात खूप पुढे गेले असते.

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून छगन भुजबळ यांच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ हे शिवसेनेच्या (ठाकरे गट) वाटेवर आहेत अशी चर्चा चालू आहे. मात्र ते कोणत्या वाटेने येत आहेत ते आम्हाला माहिती नाही. ती वाट आम्हाला तरी दिसलेली नाही. भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. मात्र त्याला आता मोठा कालखंड लोटला आहे. ते त्यांच्या प्रवासात पुढे गेले आहेत. शिवसेना स्वतःच्या प्रवासात खूप पुढे निघून गेली आहे. त्यामुळे या अफवांमध्ये तथ्य नाही. भुजबळ यांचा शिवसेनेची कोणताही संवाद नाही. तसा संवाद होण्याची शक्यता देखील नाही. कारण त्यांनी आता स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडला आहे. शिवसेना आणि भुजबळ यांच्या भूमिका एकसारख्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे भुजबळ येणार, जाणार, चर्चा होणार अशा बातम्यांना अर्थ उरत नाही. आम्ही या बातम्यांकडे केवळ अफवा म्हणून पाहतो. आम्ही त्यास महत्त्व देत नाही.

हे ही वाचा >> भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अजित पवारांवर चर्चा झाली का? बावनकुळे म्हणाले, “महायुतीतून…”

संजय राऊत म्हणाले, आमच्याकडून भुजबळ यांना कोणी भेटलं नाही, चर्चा झालेली नाही आणि होणार नाही, हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो. छगन भुजबळ यांच्या मनात खदखद आहे हे नक्की. परंतु, त्यांच्याशी आमचा संबंध नाही. भुजबळ यांनी त्यांच्या मनातली खदखद त्यांच्या पक्षापुढे, त्यांच्या नेत्यांपुढे व्यक्त करावी. अजित पवार हे त्यांचे नेते आहेत. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षांचे नेते आहेत. त्यामुळे भुजबळांनी त्यांच्या मनातली खदखद या तिघांसमोर व्यक्त करावी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray led shiv sena has no links with chhagan bhujbal says sanjay raut asc