महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायधीशांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायालयाकडून नेमका कोणता निर्णय घेतला जातो? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ‘धनुष्यबाण’ चिन्ह नेमकं कोणाचं? हा वादही निवडणूक आयोगासमोर असून न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. ठाकरे आणि शिंदे गटात न्यायालयीन पेच अद्याप सुटला नसताना शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत मोठं विधान केलं आहे.

शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप पेडणेकर यांनी केला आहे. पण न्यायालयावर आमचा संपूर्ण विश्वास असून न्यायालय आमच्या बाजुनेच निर्णय घेईल, असंही पेडणेकर यावेळी म्हणाल्या. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा- “पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीबाबत भाष्य करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्ही प्रार्थना करतोय, आमची शिवसेना ही बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आहे. बाळासाहेबांनी घेतलेलं हे धनुष्यबाण आहे. त्या धनुष्यबाणाला गोठावण्याचे मनसुबे काही लोकांकडून आखली जात आहेत. पण न्यायालयावर आमचा सगळ्यांचा संपूर्ण विश्वास आहे. न्यायालय जे निर्णय घेईल त्याला सामोरं जाऊ.

हेही वाचा- शिवसेनेतील फूट प्रकरण : घटनापीठापुढे आज सुनावणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कारण महाराष्ट्रात जे घडू नये, ते घडून गेलंय. खालच्या पातळीचं अध:पतन झालं आहे. पण न्यायव्यवस्था नीट निर्णय देईल. हे बाळासाहेब ठाकरेंचं ‘धनुष्यबाण’ आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे शिवसैनिकांचा प्राण आणि कवच कुंडलं असलेला ‘धनुष्यबाण’ आमच्याकडेच राहील” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.