महायुतीत लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यातील काही जागांवर महायुतीने अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत. ५ ते ६ जागांवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही अशीच स्थिती आहे. ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटात राहणं पसंत केलं. त्यामुळे शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे. मात्र शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडलेला नाही. अशातच ठाण्याचे आमदार आणि भाजपा नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचं त्यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत निर्णय झालेला नाही. ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. पक्षाने आम्हाला संधी दिली तर मी स्वतः आनंदाने ठाण्याची लोकसभा लढायला तयार आहे. यासाठी कार्यकर्ते नक्कीच मला मदत करतील. मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला जिंकवण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो मात्र त्यांनी अद्याप येथून उमेदवार जाहीर केलेला नाही. २५ वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी या मतदारसंघाची मोट बांधली. प्रकाश परांजपे या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले.

मागील लोकसभा निवडणुकीत युतीत जेव्हा जागावाटप झालं तेव्हा ही जागा शिवसेनेला देण्यात आली. शिवसेनेचे प्रकाश परांजपे या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. २५ वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्यांच्याआधी भाजपाचे राम कापसे ठाण्याचे खासदार होते. ते दोन वेळा येथून निवडून आले होते. मात्र त्यानंतर आनंद दिघे यांनी ठाण्यातील नगरसेवकांचं गणित मांडलं आणि मग ही जागा शिवसेनेला देण्यात आली. आता ठाण्यात आमचे आमदार अधिक आहेत. नगरसेवकही आहेत त्यामुळे ही जागा भाजपाला मिळाली तर भाजपाचा कार्यकर्ता सुखावेल.

हे ही वाचा >> ‘राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने सामान्य माणूस संभ्रमात’, शरद पवार म्हणाले, “मी पण सामान्य माणूस”

ठाण्याचे आमदार म्हणाले, तुम्ही जर ठाणे लोकसभेचं तार्किकदृष्ट्या गणित मांडलं तर तुम्हाला येथील भाजपाची ताकद दिसून येईल. सर्व काही केवळ गणितावर अवलंबून नसतं. सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. शेवटी कोणता नेता कोणत्या चिन्हावर निवडणुकीला उभा राहू शकेल हे सांगणारा मी अधिकारी नाही. शिवसेना विभक्त झाल्यानंतर जागा बदलल्या. ठाण्यातदेखील जे खासदार होते ते उद्धव ठाकरे गटात आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे गणित बदलले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane mla sanjay kelkar says if bjp gets thane loksabha seat i will contest election rno news asc