तलावपाली येथील सीगल पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकणाऱ्या नागरिकांविरोधात अखेर वन विभाग आणि ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून तलावपाली येथे सप्टेंबर ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित सीगल पक्षी येऊ लागले आहेत. गुरुवारी सकाळी ठाणे महापालिकेच्या स्वच्छता विभागाने एका व्यक्तीविरोधात ५०० रुपये दंडात्मक कारवाईही केली आहे.
या पक्ष्यांना खाद्यपदार्थ दिल्यास त्यांच्या पोटात अनावश्यक चरबी तयार होते. तसेच त्यांच्या आरोग्यास ते अपायकारक आहे. त्यामुळे ही कारवाई केली जात आहे. नागरिकांनी या पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.
दरवर्षी सप्टेंबर ते एप्रिल या कालावधीत लडाख तसेच परदेशातून ठाणे खाडीत सीगल पक्षी येत असतात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून हे पक्षी ठाण्याच्या मध्यवर्ती भाग असलेल्या तलावपाली परिसरात वास्तव्य करु लागले आहेत. हे पक्षी पाहण्यासाठी ठाणेकर मोठ्याप्रमाणात तलावपाली येथे जमत असतात. परंतु त्यांच्याकडून या पक्ष्यांना शेव, पावाचे तुकडे असे खाद्यपदार्थ टाकले जाऊ लागले आहेत. हे पदार्थ सीगल पक्ष्यांसाठी अपायकारक आहेत.
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी वन विभागाने वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशन आणि येऊर एन्व्हायर्नमेंटल वेलफेअर असोसिएशनच्या मदतीने सीगल पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकू नये यासाठी फलक बसविले होते. तसेच जनजागृतीही केली होती. परंतु पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकण्याचे काम नागरिकांकडून सुरूच होते. अनेकदा नागरिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते यांच्यामध्ये वादाचे प्रकारही घडले आहेत. अखेर गुरुवारी सकाळी ६ वाजेपासूनच ठाणे वनविभाग, ठाणे महापालिकेचे स्वच्छता विभागाचे अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या तलावपाली येथे सीगल पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईत वन विभागाला एकजण खाद्यपदार्थ टाकताना आढळून आला. त्याच्याविरोधात ठाणे महापालिकेने ५०० रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढेही कारवाई सुरुच राहणार असल्याचे वन विभागाने सांगितले.
सीगल पक्षी ठाण्यात का येतात?
ठाण्याला २८ किमी इतके विस्तीर्ण खाडी क्षेत्र लाभले आहे. हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचावासाठी लडाख किंवा युरोपातून सीगल पक्षी ठाणे खाडी परिसरात येत असतात. पूर्वी हे पक्षी खाडी किनारी थांबत असत. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून काही सीगल हे तलावपाली येथे थांबू लागले आहेत. खाडी किनारे आक्रसू लागत असल्याने त्यांनी तलावपाली येथे येण्यास सुरुवात केल्याचे वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
“गेल्या तीन वर्षांपासून आम्ही सातत्त्याने जनजागृती मोहीम घेत आहोत. या प्रयत्नांना बहुतांशी यश येताना दिसत असले तरी काही नागरिकांकडून सीगल पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकले जात आहे. दिवसभर येथे पाळत ठेवणे शक्य नाही. परंतु अधिकाऱ्यांनी गुरुवारी केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. सीगल पक्ष्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि तलाव प्रदुषित करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात कारवाईचे सातत्य असणे आवश्यक आहे,” असं येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे रोहित जोशी यांनी सांगितलं आहे.