विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे समोर आले आहे. पक्ष बदलणं गैर नाही परंतु आपण ज्या घरात वाढलो ते घरच उध्वस्त करायला निघणं ही बेईमानी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी अजित पवारांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी ४८ तासांचं सरकार बनवलं ती बेईमानी नव्हती का? असा सवाल मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे.
“२०१९ मध्ये जे ४८ तासांचं सरकार तुम्ही केलं होतं, ती बेईमानी नव्हती का? तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी केला. तो करताना शरद पवार जे तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांची परवानगी घेतली होती का? त्यांना विचारलं होतं का? असा जर प्रश्न तुम्हाला आम्ही विचारला तर तुम्हाला ते योग्य वाटणार नाही.” असं शंभुराज देसाई म्हणाले आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते? –
“आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासोबत जाऊन, मुख्यमंत्री होणं एकवेळेस समजू शकतो. त्यात गैरवाटण्याचं एकवेळ कारण नाही. पण ज्या घरात वाढलो, ज्या घरात आपण घडलो ते घरच उध्वस्त करायला निघणं ही बेईमानी महाराष्ट्रातील लोकांना अजिबात पटलेली नाही.” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते.