नांदेड : सिडको भागात एकावर तलवारीने हल्ला करून फरार झालेल्या अविनाश ऊर्फ भैय्या मिरासे या फरार आरोपीने बुधवारी मध्यरात्री पोलीस पथकावर आपल्या गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडच्या काही दिवसात नांदेड शहर गोळीबाराच्या घटनांमुळे गाजत असतानाच बुधवारच्या रात्रीची थरारक घटना समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश मिरासे याने बुधवारी दुपारी सिडकोजवळच्या दत्तनगर भागात कृष्णा बावरी याच्यावर तलवारीने हल्ला करून त्यास जखमी केले होते. या प्रकरणी मिरासे याच्याविरुद्ध भारतीय संहितेतील कलम १०९ अनुसार गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.
बुधवारी रात्री आरोपी अविनाश हा आपल्या दोन साथीदारांसह झरी गावाजवळच्या खदान परिसरात मद्यपान करत बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स.पो.नि. पांडुरंग माने, फौजदार पुयड व त्यांचे पथक खदानीजवळ गेले असता मिरासे याने आपल्याकडील गावठी पिस्तुलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडल्यानंतर प्रसंगावधान राखत एपीआय माने यांनी त्याच्या दिशेने झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी त्याच्या पायाला लागल्यामुळे तो जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर पोलिसांनी मिरासे याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.