कर्जत तालुक्यातील खांडवी कोंभळी परिसरामध्ये एमआयडीसी मंजूर झाली आहे. या परिसरामध्ये शेतकऱ्यांची संमती न घेताच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अंतर्गत कलम ३२ ( २ ) नुसार उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून नोटीस देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कोणतीही पूर्वकल्पना न देता एमआयडीसी साठी अधिग्रहण अशी उताऱ्यावर नोंद ही करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी यामध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरुष ,युवक हे सर्वजण एमआयडीसी ज्या लाभक्षेत्रामध्ये होणार आहे, त्या परिसरामध्ये शेतजमीन बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये आमच्या काळ्या आईचा सौदा आम्ही करू देणार… नाही . व बागायची शेतजमिनीच्या परिसरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एमआयडीसी होऊ देणार नाही… आम्हाला एमआयडीसी नको…अशा घोषणा दिल्या.
यावेळी महिला शेतकरी अधिक आक्रमक झाल्या होत्या. जर कुणी आमची शेत जमीन घेण्यासाठी पुढे आला तर सर्वप्रथम आम्ही आमच्या जीवाचे बलिदान देऊ, सर्व वृद्ध मंडळी घरातील लहान मुले यांच्यासह आत्महत्या करू, मात्र आमची शेत जमीन एमआयडीसी ला देणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली. या शेतजमिनी आम्ही आमच्या पोटच्या मुला बाळासारख्या सांभाळाल्या आहेत. दुसऱ्यांच्या शेतामध्ये मोल मजुरी करून रोजंदारीने काम करून या शेत जमिनी घेतल्या आहेत, बँकांचे कर्ज काढले, त्याची कर्जाची रक्कम अद्याप आमची फिटलेली नाही, या सर्व जमिनी बागायती केल्या आहेत, फळबागा, शेततळे, विहिरी या परिसरामध्ये घेतल्या असून जर आमच्या जमिनी आपण एमआयडीसीसाठी अधिग्रहित केल्या तर आम्ही भूमी हिन होवू अशी भूमिका शेतकरी महिला व नागरिकांनी मांडली. प्रसंगी रस्त्यावर उतरू, रस्ता रोको आंदोलन करू, शासनाचे कार्यालय बंद पाडू . मात्र आमच्या जमीन आम्ही औद्योगीकरणासाठी देणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
अंधारात ठेवून फसवले आरोप
यावेळी शेतकऱ्यांनी बोलताना आरोप केला की, या परिसरामध्ये एमआयडसी होणार नव्हती. थेरगाव परिसरामध्ये समितीने पाहणी देखील केली होती. असे असताना त्या ठिकाणचा परिसर वन विभागाच्या लगत असल्यामुळे औद्योगिकीकरणासाठी नाकारण्यात आला आहे. आमच्या परिसराचा काहीही संबंध नसताना, आमच्या परिसरामध्ये एमआयडीसी साठी शेत जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. वास्तविक पाहता आमच्या शेतजमीन घेण्या अगोदर ग्रामसभा घेऊन त्यांची मान्यता घेण्याची आवश्यकता होती ,गावामध्ये दवंडी देणे, ग्रामपंचायतीमध्ये नोटीस लावणे, स्थळ पाहणी करणे ,याची सर्व माहिती परिसरातील शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता असताना ,याबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आणि थेट आमच्या सातबारा उताऱ्यावर शासनाने परस्पर नोंदी लावल्या आहेत.ही एक प्रकारे आमची फसवणूक केली आहे. यामुळे या पढील काळात ज्या नेत्यांचा एमआयडीसीला पाठिंबा आहे.
ते कोणीही आमदार, मंत्री, स्थानिक नेते यांना गावामध्ये प्रवेश करून येणार नाही. असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी सुमन तापकीर, लता तापकीर, वैशाली तापकीर, शितल तापकीर, संगीता तापकीर, वंदना तापकीर, प्रमोद तापकीर, प्रदीप तापकीर, मिनीनाथ तापकीर, सुरेखा तापकीर, भारती गांगर्डे, मिरा तापकीर, निता तापकीर, सविता तापकीर, मनीषा तापकीर, अश्विनी तापकीर, राणी तापकीर, नंदा वायसे, अमित शेलार, भाऊसाहेब गोरखे,ऋषी गोरखे, पिन्टू उदमले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी महिला,पुरुष व युवक, नागरिक उपस्थित होते.
यामुळे खांडवी कोंभळी एमआयडीसी देखील आता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे अडचणीत सापडली आहे.