निर्बंध असतानाही खरेदीसाठी गर्दी
सांगली : करोना संसर्गाबाबत खबरदारी म्हणून गणेशचतुर्थीच्या पूर्व संध्येलाच काही कुटुंबामध्ये श्रींचे आगमन झाले. करोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक उत्सव साजरा करण्यावर र्निबध असले तरी गणेश भक्तांच्या उत्सवावर याचा फारसा परिणाम झालेला नाही हे खरेदीसाठी झालेल्या गर्दीवरून स्पष्ट झाले.
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आज सायंकाळपासून काही घरगुती गणेशाचे स्वागत करण्यात आले. चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणेशाचे आगमन करण्याची परंपरा काही कुटुंबामध्ये आहे. तर शुक्रवारी श्रींचे आगमन करण्यापूर्वी मूर्तीची निश्चिती करण्यासाठी मूर्तिकारांच्या कार्यशाळेबरोबरच विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलवर गणेश भक्तांची गर्दी झाली होती. सांगलीमध्ये जिल्हा बँकेजवळ श्रींच्या मूर्तीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेल्या ५० हून अधिक विक्रेत्यांनी आपले स्टॉल लावले आहेत.
गणेश सजावटीसाठी लागणार्या साहित्याची खरेदी करण्यासाठी सांगलीतील मारूती रोड, हरभट रोड या ठिकाणी गणेश भक्तांची आज अभूतपूर्व गर्दी पाहण्यास मिळाली. तर मिरजेतील हायस्कूल मदानावर साहित्य, फळे यांच्या खरेदीसाठी स्वतंत्र व्यवस्था महापालिकेने करून रस्त्यावर होणाऱ्या गर्दीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, करोना संसर्गामुळे सार्वजनिक मंडळांच्या श्रींच्या प्रतिष्ठापनेवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. श्रींची मूर्ती चार फुटापेक्षा उंच ठेवण्यावरही र्निबध आहेत. तसेच मिरवणूक, ध्वनीवर्धक, वाद्य यांनाही मनाई करण्यात आली आहे. गणेश मंदिराचे दरवाजे बंद असल्याने गणेश भक्तांना दरवाज्यातूनच दर्शन घ्यावे लागत आहे. सांगलीतील प्रसिध्द गणेश मंदिराचे प्रवेशद्बारही बंद असले तरी मंदिरावर नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.