पालघर : वसई कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. १७ पैकी १६ जागांवर बविआचे उमेदवार निवडून आले आहेत तर केवळ एका जागेवर भाजपाचा उमेदवार निवडून आला आहे.
वसई कृषीउत्त्पन्न बाजार समिती रविवारी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून चांदीप आणि वसई तहसीलदार या केंद्रावर मतदानाला सुरवात झाली होती. कृषी उत्त्पन्न बाजार समितीवर आतापर्यंत बहुजन विकास आघाडीने येथील सत्ता एकहाती आपल्या हाती ठेवली होती. यावेळी मात्र बहुजन विकास आघाडीच्या विरोधात श्रमजीवी, शिवसेना, भाजपा या पक्षांच्या पॅनलचे उमेदवारही रिंगणात उतरले होते.
वसई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १७ जागा असून त्यापैकी बहुजन विकास आघाडीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, एका जागी भाजपाची महिला उमेदवार बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे ११ जागांसाठी १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कृषी पतसंस्था व सहकारी पतसंस्था मतदारसंघामध्ये १८४ मतदार, तर ग्रामपंचायत मतदारसंघात ३०१ मतदार, असे ४८५ मतदार होते. त्यापैकी ४६९ मतदारांनी मतदान केले आहे. सायंकाळी तहसीलदार विभागात साडेपाच वाजता मतमोजणी सुरू करण्यात आली होती.
हेही वाचा – सांगली : जतमधील मायलेकीचा खून करणी-भानामतीच्या संशयातून
अवघ्या तासाभरातच मतमोजणी पूर्ण होऊन ११ पैकी ११ जागांवर बविआचे उमेदवार निवडून आले. आधीच पाच उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते. एका जागी भाजपाची महिला उमेदवार निवडून आली होती. त्यामुळे १७ पैकी १६ जागी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याने पुन्हा एकदा कृषी उत्त्पन्न बाजार समितीवर बविआचा झेंडा फडकला आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत
वसईच्या कृषी उत्त्पन्न बाजार समितीची निवडणूक अतिशय शांततेत पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी शेखर घाडगे, निवडणूक निर्णय अधिकारी सुहास पवार यांच्या देखरेखीखाली पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा – Maharashtra Din 2023 : महाराष्ट्राबद्दल ‘या’ २० खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
विजयी उमेदवार
किशोर नाना किणी
अशोक ऑगस्टिन कोलासो
प्रणय गजानन कासार
किरण जनार्दन पाटील
मोरेश्वर गणपत पाटील
हरीश कमलाकर पाटील
जोसेफ फिदलेस परेरा
पांडुरंग बाबुराव पाटील
अरुण वामन भोईर
चंद्रकांत बाबू भोईर
रवींद्र त्रिंबक पाटील
( बिनविरोध उमेदवार )
भारती गजानन राऊत
आनंद प्रकाश वडे
श्वेता सचिन पाटील (भाजपा)
संजय गजानन घरत
विमलकुमार सुरेशकुमार अंबानी
सुनील अनंतराव सरवैया