पुणे शहराच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकात अजित पवारांचा उल्लेख आल्याने मोठी खळबळ माजली आहे. पुण्याचे मध्यवर्ती कारागृह येरवडा कारागृहाचा लिलाव पूर्ण झाला असून त्याचे हस्तांतरण करण्याच्या सूचना तत्कालीन पालकमंत्री (अजित पवार) यांनी केला होता, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. यावरून राज्यात अजित पवारांविरोधात जोरदार चर्चा झाली असून मीरा बोरवणकर यांनी आता पुन्हा मोठा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्कालीन मंत्री यांनी जागेचा लिलाव यशस्वी झाला असून जागेचा ताबा सर्वाधिक बोली लावण्याऱ्याला देण्यास सांगितलं होतं. परंतु, येरवडा कारागृह ही प्राईम जागा आहे. क्वाटर्ससाठीही अशी जागा पुन्हा मिळणार नाही. तसंच, लिलाव आधीच पूर्ण झाला होता, मग तेव्हाच हस्तांतरण का झालं नाही असा सवालही पुस्तकातून विचारण्यात आला आहे, असं मीरा बोरवणकर आज पत्रकार परिषदेत बोलल्या. तसंच, शासकीय जागेवर बिल्डरची नजर असतेच, त्याला वाचवणं आणि सार्वजनिक हितासाठी वापरणं ही आपली जबाबदारी आहे, असंही त्या म्हणाल्या.

“पुस्तक लिहिल्यापासून अनेक पोलिसांचे फोन येत आहेत. तुमच्यामुळे आमची जागा वाचली असं ते म्हणत आहेत. असंच प्रकरण औरंगाबादेतही झालं होतं. हायकोर्टाचे रिटायर्ड न्यायमूर्ती बी. एच मल्ला पल्ले यांनी पाठवलं आहे. ते म्हणाले की असं एक प्रकरण औरंगाबादलाही झालं होतं. गारखेडा नावाची जागा होती, कोणीतरी खासगी मालकाला देण्यात आली होती. ती जागा ५० एकर होती. त्यावेळी दोन शासकीय अधिकारी बी. रमणी आयुक्त होते आणि राधा मॅडम जिल्हाधिकारी होत्या. त्यांनी ही जागा हस्तांतरित करण्यासा नाकारलं होतं, मग हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टातही ते गेले आणि त्यांनी ती जागा वाचवली”, असं उदाहारणही त्यांनी दिलं.

पुस्तकाला राजकीय रंग दिला जातोय का?

या पुस्तकाला राजकीय रंग दिला जातोय, असा आरोप केला जातोय. यावर मीरा बोरवणकर म्हणाल्या की, “हे पुस्तक वर्षभरापूर्वी संपादनासाठी दिला होता. दोन महिन्यांपासून हे पुस्तक प्रिंटिंगला होते. त्यामुळे हे पुस्तक राजकीय नाही.”

हेही वाचा >> मीरा बोरवणकरांनी अजित पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवार म्हणाले…

सगळ्यांचे परस्पर हितसंबंध

शासकीय जागा बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत, यामागे परस्पर हितसंबंध असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला आहे. त्यावर मीरा बोरवणकर म्हणाल्या की, “बिल्डर, अधिकारी, राजकीय नेते आणि पोलीस यांचे हितसंबंध आहेत. हे वाक्य मी अंडरलाईन करेन. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावंच लागणार आहे.”

चौकशी व्हायला हवी

येरवडा कारागृहाबाबत मॅडम कमिश्नर या पुस्तकातून समोर आल्यानंतर राज्यातील इतर शासकीय जागांचीही चौकशी व्हावी, असं मत मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या की, “एवढ्या मोठ्या प्रमाणावर फोन कॉल आणि मेसेज येऊ लागल्या आहेत, त्यानुसार मला आता वाटतंय की जिथे जिथे खासगी व्यावसायिकांना जागा दिल्या आहेत, तिथे तिथे पुन्हा तपासणी करण्याची गरज आहे”, असंही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The builder has an eye on the government space meera borwankars accusation again sgk
Show comments